आगामी जून महिन्यात इंग्लंडच्या साउथम्पटनच्या मैदानावर जागतिक क्रिकेट मधील महामुकाबला रंगणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ १८ ते २२ जून दरम्यान आमनेसामने असतील. दोन्ही संघ क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच खेळवण्यात आलेल्या या कसोटी क्रिकेटच्या सर्वोच्च स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहेत. दोन्ही संघ त्यासाठी कसून सराव देखील करत आहेत.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सामन्यात कोणता संघ विजेतेपदाचा मुकुट परिधान करणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेक दिग्गज याबद्दल आपापली मते मांडत आहेत. यातच आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी देखील आपला तर्क मांडला आहे. या अंतिम सामन्यात कोणता संघ विजयी ठरणार याबाबत त्यांनी नुकतेच भाष्य केले.
कोहलीच्या प्रशिक्षकांची ‘या’ संघाला पसंती
विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय संघच जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या मते कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.
ते म्हणाले, “विद्यमान भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. आपला संघ अंतिम सामन्यात जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यापूर्वी देखील अनेक विक्रम केले आहेत. आता त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्यावहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावून भारतीय संघ इतिहास रचेल.”
“भारतीय संघ अतिशय संतुलित”
राजकुमार शर्मा यांच्या मते सध्याचा भारतीय कसोटी संघ अतिशय संतुलित आहे. संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे सुयोग्य मिश्रण आहे, असे ते म्हणाले. अनेक खेळाडूंचा हा पहिला इंग्लंड दौरा आहे, त्यामुळे दमदार कामगिरी करत आपली छाप सोडण्याची त्यांना संधी असेल, असेही मत राजकुमार शर्मा यांनी यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले, “भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्यावर असेल. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांची तिकडी कमाल करेल. न्यूझीलंडला या सामन्यात एका फिरकीपटूची कमी जाणवू शकते. पण यावर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत केल्याने भारतीय संघाचे मनोबल उंचावलेले असेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
आर्चर बाबा की जय! आयपीएल पुनरागमनाच्या घोषणेनंतर ६ वर्षांपूर्वीचे हे ट्विट व्हायरल
देशापुढे वैयक्तिक मुद्दे गौण, त्या वादावर मितालीने टाकला पडदा