भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान गुरुवारपासून (४ मार्च) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना अहमदाबाद येथे सुरू झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या फलंदाजांना नियमित अंतराने बाद करत पहिल्या दिवशी सामन्यावर वर्चस्व निर्माण केले आहे. या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरत आज दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपापल्या संघांसाठी कर्णधारपदाचे वेगवेगळे विक्रम आपल्या नावे केले.
कोहलीचा झाला दिग्गज कर्णधारांमध्ये समावेश
अहमदाबाद येथील चौथ्या कसोटीत कर्णधार म्हणून मैदानात उतरताना विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातवे स्थान पटकावले. कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून विराटचा हा ६० वा सामना आहे.
या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ १०९ सामन्यासह प्रथमस्थानी आहे. त्यापाठोपाठ, ऑस्ट्रेलियाचे विश्वविजेते कर्णधार ऍलन बॉर्डर व न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग हे अनुक्रमे ९३ व ८० सामन्यासह दुसर्या आणि तिसर्या स्थानी आहेत. ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेला रिकी पॉंटिंग ७७ तर वेस्ट इंडीजला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारे क्लाईव्ह लॉईड यांनी ७४ सामन्यात आपापल्या संघाचे नेतृत्व केले होते.
त्यानंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा क्रमांक लागतो. धोनीने देखील ६० आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. त्यामुळे या यादीत विराटने धोनीची बरोबरी केली आहे. याशिवाय आता कसोटीत भारताचे सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करण्याच्या यादीत विराट आणि धोनी संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आले आहेत.
रूटचे अर्धशतक
विराट प्रमाणेच इंग्लंडचा कर्णधार जो रूट याचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ५० वा सामना आहे. इंग्लंडचे यापूर्वी चार कर्णधारांनी ५० पेक्षा अधिक सामन्यात नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये, ऍलिस्टर कुकने ५९ तर माइक आथरटन यांनी ५४ सामन्यात इंग्लंडची नेतृत्व केले होते. त्यानंतर, मायकेल वॉन ५१ तर ऍण्ड्रू स्ट्रॉसने ५० कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारताची गोलंदाजांची पुन्हा कमाल
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. अक्षर पटेलने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची धार दाखवत इंग्लंडच्या ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. रविचंद्रन अश्विनने ३ तर, मोहम्मद सिराजने २ बळी आपल्या नावे केले. वॉशिंग्टन सुंदर यालादेखील एक बळी मिळविण्यात यश आले. इंग्लंडचा डाव पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावानंतर प्रथमच दोनशे धावांच्या पुढे जाऊन २०५ धावांवर संपला. इंग्लंडकडून अष्टपैलू बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
स्पायडरमॅन नंतर आता पंत बनला ‘स्टंटमॅन’, विराटलाही करावे लागले कौतुक; व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ : मोहम्मद सिराजच्या भेदक चेंडूवर बेअरिस्टो निरुत्तर, पायचीत होऊन परतला तंबूत
धोनीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी केली तोबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज