ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेला उद्यापासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे सुरुवात होईल. मालिकेतील शुभारंभाचा हा सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र स्वरूपात खेळवला जाईल. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. तत्पूर्वी, सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही कर्णधारांनी संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दोन्ही कर्णधारांनी आगामी मालिकेत स्लेजिंगविषयी प्रश्नांची उत्तरे दिली.
दोन्ही कर्णधारांनी मांडल्या स्लेजिंगविषयी भूमिका
ऍशेस मालिकेनंतर सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला उद्या ऍडलेड येथे सुरुवात होईल. तत्पूर्वी, मालिकेच्या पूर्वसंध्येला दोन्ही कर्णधारांनी एकत्रितरीत्या पत्रकार परिषद घेतली. भारताचा कर्णधार विराट कोहली व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यांनी आगामी मालिकेत स्लेजिंगचे काय स्थान असेल ? याविषयीच्या प्रश्नांना उत्तरे दिली. भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला, “मला वाटते मैदानावर आवश्यक नसलेल्या निरर्थक गोष्टींना टाळण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. कोरोना महामारीमुळे लोकांच्या मानसिकतेत खूप बदल झाला आहे. खेळाडू आणि संघांमध्ये अनावश्यक तणाव असू नये. तुम्ही व्यवसायिक खेळाडू आहात. त्यामुळे सकारात्मक राहणे फायदेशीर ठरेल. मैदानावरच्या देहबोली आणि खेळाने आपला आक्रमकपणा दाखवायला हवा.”
भारतीय कर्णधाराच्या काहीशी उलट प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने दिली. पेन म्हणाला, “मैदानावर तणाव राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कोणीही असे प्रकार नियोजनबद्ध रीतीने करत नाही. अतिआक्रमकता ही ठरवून होत नाही. आम्ही बाहेर ठरवलेल्या योजना मैदानात अमलात आणण्याचा प्रयत्न करू. मात्र, मैदानात कधीकधी आक्रमकता वाढते. अशावेळी आम्ही मागे हटणार नाही.”
मागील मालिकेत रंगला होता पेन-पंत यांच्यात कलगीतुरा
मागील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन व भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्या दरम्यान अनेक मजेशीर किस्से घडले होते. पेनने पंतला ‘बेबीसिटर’ म्हटल्यानंतर पंतने त्याला ‘टेम्पररी कॅप्टन’ म्हणत हिणवलेले. त्यानंतर, पंतने पेनच्या मुलांसोबत खेळत हा वाद नसल्याचे स्पष्ट केले होते.
संबधित बातम्या:
– कसोटी मालिकेत स्लेजिंग तर होणारच! ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचे विधान
– विराटला उकसवू नका, या ऑस्ट्रेलियन खेळाडूने दिला सहकाऱ्यांना इशारा
– ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; या खेळाडूला मिळाली संधी