भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील २ कसोटी सामन्यांची मालिका नुकताच संपन्न झाली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता, तर दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ३७२ धावांनी मोठा विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ने विजय मिळवला आहे. दरम्यान मालिका जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने असे काही कृत्य केले आहे, ज्याने कोट्यवधी चाहत्यांचे मन जिंकले आहे.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. या सामन्यातून श्रेयस अय्यरने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच पदार्पणाच्या सामन्यात त्याने ऐतिहासिक कामगिरी करत शतक आणि अर्धशतक झळकावले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले होते. मात्र, अखेरच्या दिवशी न्यूझीलंडने दिलेल्या कडव्या लढतीमुळे सामना अनिर्णित राहिला होता. पण सामन्याचा सामनावीर पुरस्कार श्रेयसला मिळाला होता.
त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यर याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. पण मयांक अगरवालच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने मोठी संख्या उभारली आणि हा सामना आपल्या नावावर केला. यासह भारतीय संघाने सलग १४ वेळा मायदेशात कसोटी मालिका जिंकली आहे.
ही मालिका आपल्या नावावर केल्यानंतर विराट कोहली याने मालिका चषक स्वीकारला आणि त्यानंतर तो पदार्पणवीर श्रेयस अय्यरच्या हाती सोपवला. विराट कोहलीने देखील युवा खेळाडूच्या हाती चषक देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. विराट कोहलीच्या या मन जिंकणाऱ्या कृत्याचे सोशल मीडियावर तोंडभरून कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे सोमवारी (६ डिसेंबर) श्रेयस अय्यर आपला २७ वा वाढदिवस साजरा करत होता. त्यामुळे हा त्याच्या आयुष्यातील एक खास क्षण ठरला.
CHAMPIONS 👏👏
This is #TeamIndia's 14th consecutive Test series win at home.#INDvNZ @Paytm pic.twitter.com/FtKIKVCzt8
— BCCI (@BCCI) December 6, 2021
पहिल्या डावात भारतीय संघाने उभारला ३२५ धावांचा डोंगर
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२५ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून मयांक अगरवालने सर्वाधिक १५० धावांची खेळी केली होती. तर अक्षर पटेलने ५२ आणि शुबमन गिलने ४४ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली होती, तर न्यूझीलंड संघाकडून एकट्या एजाज पटेलने १० गडी बाद केले होते.
भारतीय गोलंदाजी समोर किवी फलंदाजांनी टाकल्या नांग्या
भारतीय संघाने दिलेल्या ३२५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंड संघाचा संपूर्ण पहिला डाव अवघ्या ६२ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंड संघाकडून काईल जेमिसनने सर्वाधिक १७ धावा केल्या, तर टॉम लेथमने १० धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आर अश्विनने सर्वाधिक ४ तर मोहम्मद सिराजने ३ गडी बाद केले.
Test series win with #TeamIndia 🇮🇳 Couldn’t have asked for a better birthday 😁 Thank you everyone for your wishes. One to remember ❤️ pic.twitter.com/WBkXlgyjr5
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) December 6, 2021
भारतीय संघाने दिले ५४० धावांचे आव्हान
भारतीय संघातील फलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मयांक अगरवालने ६२ धावांची खेळी केली, तर शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी ४७ धावांची खेळी केली. भारतीय संघाने दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित केला. न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यासाठी ५४० धावांची आवश्यकता होती.
भारतीय संघाचा ३७२ धावांनी विजय
भारतीय संघाने हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला ५४० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून डॅरील मिशेलने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली, तर हेन्री निकोलसने ४४ धावांचे योगदान दिले. इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करत आली नाही. न्यूझीलंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १६७ धावांवर संपुष्टात आला. हा सामना भारतीय संघाने ३७२ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
पुण्यापासून लंडनपर्यंत चर्चेत असलेला ‘तो’ अंपायर आहे कोण? व्हिडिओने सोशल मीडियावर लावलीय आग
आर अश्विनची बातच न्यारी!! ‘असा’ कारनामा करत कुंबळे-मुरलीधरनसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
एका दिग्गजाची दुसऱ्या दिग्गजाला दाद! आर अश्विनकडून एजाज पटेलला खास भेट, व्हिडिओ व्हायरल