ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. पण या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर मंगळवारी(२२ डिसेंबर) भारताचा कर्णधार विराट कोहली भारतात येण्यासाठी ऑस्ट्रेलियावरुन रवाना झाला आहे. त्याने पालकत्व रजा घेतली आहे.
विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा त्यांच्या पहिल्या बाळाला जानेवारी २०२१ मध्ये जन्म देणार आहे. त्यामुळे कसोटी मालिका सुरु होण्याआधीच विराटसाठी बीसीसीआयने पालकत्व रजा मंजूर केली होती. त्यानुसार आता विराट भारतात परतणार आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेतील उर्वरित ३ सामन्यात भारताचे प्रभारी कर्णधारपद अजिंक्य रहाणे सांभाळेल.
विराटने घेतली खास बैठक
काही माध्यमांतील वृत्तानुसार भारतात येण्यासाठी रवाना होण्यापूर्वी विराटने भारतीय संघाची खास बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान त्याने सर्व संघसहकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना उर्वरित कसोटी मालिकेसाठी प्रोत्साहन दिले आहे.
कसोटी मालिकेत भारतीय संघ पिछाडीवर –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात उत्तम कामगिरी केली होती. पहिल्या डावात भारताने ५३ धावांची आघाडीही घेतली होती. मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव केवळ ३६ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे ९० धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने हा सामना ८ विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
त्यातच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पहिल्या कसोटीदरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे सुरु होईल. या सामन्यात विराट आणि शमीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला खेळावे लागणार आहे. त्यांच्याऐवजी केएल राहुल आणि मोहम्मद सिराजला अंतिम ११ जणांच्या भारतीय संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
आता भारतासमोर या कसोटी सामन्यातून मालिकेत विजयी पुनरागमन करण्याचे आव्हान आहे.
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर
IND v AUS: कसोटी सामन्यांदरम्यान स्टंप माईकमधून ऐकू आलेल्या ३ मजेदार शाब्दिक चकमकी
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार स्टीव स्मिथच्या आकडेवारीमुळे राजस्थान रॉयल्स चिंतीत; केले असे ट्विट
बॉक्सिंग डे कसोटी! पाहा काय आहे भारताचा आत्तापर्यंतचा इतिहास