2019 विश्वचषकातील साखळी फेरीचे सर्व सामने 6 जूलैला संपले आहेत. साखळी फेरीतील सामन्यांनंतर गुणतालिकेत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ याच अनुक्रमाने पहिल्या चार क्रमांकावर आहेत.
त्यामुळे आता 9 जूलैपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना मँचेस्टरला होणार आहे. तर 11 जूलैला दुसरा उपांत्य सामना बर्मिंगहॅमला ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात होणार आहे.
विशेष म्हणजे 9 जूलैला भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या या उपांत्य सामन्यामुळे एक खास योगायोग घडणार आहे.
2008 च्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारताचा कर्णधार असलेला विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार असलेला केन विलियम्सन उपांत्य सामन्यात आमने-सामने आले होते. म्हणजे 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकातही भारत आणि न्यूझीलंड संघात उपांत्य सामना झाला होता.
त्यावेळी भारताचे नेतृत्व विराट आणि न्यूझीलंडचे नेतृत्व विलियम्सन करत होता. त्यामुळे आता 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या संघांचे कर्णधार म्हणून हे दोघेही एकमेकांविरुद्ध विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळणार आहेत.
आणखी खास गोष्ट म्हणजे 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताकडून न्यूझीलंड विरुद्ध रविंद्र जडेजाही खेळला होता. तर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथीही या उपांत्य सामन्यात खेळले होते. 2019 च्या वनडे विश्वचषकातही हे खेळाडू आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात झालेला हा उपांत्य सामना भारताने 3 विकेट्सने जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विश्वचषकही जिंकला होता.
न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या त्या उपांत्य सामन्यात विराटला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. त्याने न्यूझीलंड विरुद्ध 43 धावा केल्या होत्या आणि 2 विकेट्सही घेतल्या होत्या. यातील एक विकेट ही विलियम्सनची होती. याच सामन्यात विराटचा झेल विलियम्सनने घेतला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…आणि अखेर धोनीचे गेल्या वाढदिवसाला अपुर्ण असलेले स्वप्न पुर्ण झाले