उद्यापासून (१२ मार्च) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या धरमशाला येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे.
या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक खास पराक्रम करण्याची संधी आहे. त्याने जर या मालिकेत १३३ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो वनडे क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा पूर्ण करेल.
तसेच तो वनडेत १२ हजार धावा पूर्ण करणारा जगातील केवळ ६ वा खेळाडू तर भारताचा दुसराच खेळाडू ठरेल. याआधी असा पराक्रम भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेच्या कुमार संगकारा, माहेला जयवर्धने आणि सनथ जयसुर्या यांनी केला आहे.
याबरोबरच वनडेमध्ये सर्वात जलद १२ हजार धावा करण्याचाही विश्वविक्रम विराटच्या नावावर होऊ शकतो. कारण याआधी १२ हजार वनडे धावा करणाऱ्या पाचही फलंदाजांना हा टप्पा ओलांडण्यासाठी ३०० किंवा त्यापेक्षा अधिक डाव खेळावे लागले आहेत. तर विराटने सध्या २४८ वनडे सामन्यात २३९ डाव खेळताना ५९.३३ च्या सरासरीने ११८६७ धावा केल्या आहेत.
सध्या सर्वात जलद १२ हजार वनडे धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने ३०० व्या डावात खेळताना १२ हजार वनडे धावांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे विराटने पुढील ६० डावात जरी १२ हजार वनडे धावांचा टप्पा पार केला तरी तो सर्वात जलद १२ हजार वनडे धावा करणारा फलंदाज ठरेल.
वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
१८४२६ – सचिन तेंडुलकर
१४२३४ – कुमार संगकारा
१३७०४ – रिकी पाँटिंग
१३४३० – सनथ जयसुर्या
१२६५० – माहेला जयवर्धने
११८६७ – विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या-
–“भारताला भारतातच पराभूत करणे अशक्य”
–कोरोनामुळे महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातून आयपीएलचे सामने ढकलणार पुढे?
–आशिया इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन सामन्यांनाही बसला कोरोनाचा जोरदार फटका!