भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याच्या टी२० संघाच्या नेतृत्त्वपद सोडण्याच्या घोषणेनंतर भारतीय क्रिकेटवर्तुळात टी२० संघाचा भावी कर्णधार आणि उपकर्णधार कोण असेल? याच्याविषयी चर्चा सुरू आहे. आगामी टी२० विश्वचषक २०२१ नंतर कोहली या स्वरुपातील नेतृत्त्वपदाचा राजीनामा देणार आहे. त्याच्यानंतर सध्याचा उपकर्णधार रोहित शर्माच्या हाती संघाची कमान येण्याची शक्यता वर्तवली आहे. अशात रोहित संघनायक बनल्यास टी२० संघाच्या उपकर्णधाराबद्दल निर्णय घेण्यासाठी संघ निवडकर्त्यांची डोकेदुखी होऊ शकते.
या पदासाठी २ खेळाडूंमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळू शकते. सलामीवीर केएल राहुल आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांना टी२० संघाचा नवा उपकर्णधार नियुक्त केले जाऊ शकते. हे दोन्ही खेळाडू सध्या टी२० लीग आयपीएलमध्ये आपापल्या संघांचे कर्णधार आहेत.
जर गतवर्षीचा आयपीएल उपविजेता दिल्ली कॅपिटल्सने यावर्षी जेतेपद पटकावले, तर पंतची राष्ट्रीय टी२० संघाच्या उपकर्णधारपदी वर्णी लागू शकते. बीसीसीआयच्या एका सूत्राने याविषयी बोलताना म्हटले आहे की, “पंत या पदासाठी मजबूत दावेदार आहे. परंतु या शर्यतीत राहुलचे नावही विसरुन चालणार नाही. कारण तो आयपीएलमधील संघाचा कर्णधार आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह हा सुद्धा सरप्राइज पॅकेज ठरू शकतो.”
याप्रकरणी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही आपले मत मांडले आहे. त्यांनी टी२० संघाच्या उपकर्णधारासाठी राहुलवर विश्वास दाखवला आहे.
सुनील गावसकर यांचे स्पष्ट मत आहे की, टी२० विश्वचषक झाल्यानंतर जेव्हा रोहितला कर्णधारपद दिले जाईल. त्यावेळी संघाचे उपकर्णधारपद राहुलला दिले गेले पाहिजे.
गावसकर म्हणाले की, “जर भारतीय संघ नवीन कर्णधार तयार करण्याच्या प्रयत्नात असेल तर त्यांनी राहुलकडे अधिक लक्ष केंद्रित करावं. त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्ये देखील त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच त्याने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्याला उपकर्णधारपद देण्यात यावे.”
राहुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच आयपीएल स्पर्धेत तो पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व करतो. सुनील गावसकरांनी केएल राहुलच्या नेतृत्वाचे कौतुक करताना म्हटले की, “राहुलने आयपीएल स्पर्धेत प्रभावी नेतृत्व क्षमता दाखवली आहे. त्याने आपल्या फलंदाजीवर नेतृत्वाचा कुठलाही दबाव येऊ दिला नाही. त्यामुळे सध्या उपकर्णधार पदासाठी राहुलचा विचार केला जाऊ शकतो.”
अशात राहुल किंवा पंत यांपैकी एक खेळाडू टी२० संघाच्या उपकर्णधारपदाच्या शर्यतीत बाजी मारेल? की इतर कोणाला या पदी संधी मिळेल? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘झिरों’मध्ये नंबर १ आहेत रोहित, रायुडूसह ‘हे’ ५ क्रिकेटर; अजून फक्त १ चूक, मग मोडतील नकोसा रेकॉर्ड
न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याने संतापले पाकिस्तानी चाहते; म्हणे, ‘क्राइस्टचर्चचा गोळीबार विसरलात का?’
मुंबईचे प्रतिनिधित्व केलेले पाच ‘चॅम्पियन’ आज आहेत सीएसकेचे सदस्य