अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारी (२० मार्च) टी२० मालिकेतील निर्णायक पाचवा सामना पार पडला. हा सामना भारताने ३६ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली. या विजयात भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोलाचा वाटा उचलला. त्यासह त्याने एक विश्वविक्रमही आपल्या नावे केला.
विराटचे अर्धशतक
पाचव्या सामन्यात विराट उपकर्णधार रोहित शर्मासह सलामीला फलंदाजीला उतरला होता. या दोघांनी ९४ धावांची सलामी दिली. रोहित ६४ धावा करुन बाद झाला. पण त्यानंतरही विराटने आपली फलंदाजी सुरु ठेवत २० व्या षटकाच्या अखेरपर्यंत ५२ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ८० धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला २० षटकात २ बाद २२४ धावांचा डोंगर उभारता आला. प्रतिउत्तरादाखल इंग्लंडला २० षटकात ८ बाद १८८ धावाच करता आल्या.
विराटचा विश्वविक्रम
या ८० धावांच्या खेळीसह विराट आता आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. त्याने केन विलियम्सन, ऍरॉन फिंच आणि ओएन मॉर्गन यांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. विराटच्या आता कर्णधार म्हणून ४५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १५०२ धावा झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार
१५०२ धावा – विराट कोहली (४५ सामने)
१४६२ धावा – ऍरॉन फिंच (४४ सामने)
१३८३ धावा – केन विलियम्सन (४९ सामने)
१३२२ धावा – ओएन मॉर्गन (५९ सामने)
१२७३ धावा – फाफ डू प्लेसिस (४० सामने)
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चमकला विराट
विराटने इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३ वेळा ७० धावांचा टप्पा पार करताना एकून ५ सामन्यात ११५ च्या सरासरीने २३१ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
विराट हा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा केवळ कर्णधारच नाही तर त्याच्या नावावर फलंदाज म्हणूनही सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ३००० धावा करणारा पहिला आणि सध्यातरी एकमेव फलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ९० सामन्यात ३१५९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वनडेपाठोपाठ टी२० मालिकेत टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात; दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या सामन्यात मोठा विजय
‘कर्णधार’ कोहलीचा नवा विश्वविक्रम! केन विलियम्सनला मागे टाकल मिळवले पहिले स्थान
मालिका विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव, ट्विटरवरून दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा