सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यानंतर दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. या दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघात मोठे बदल होणार असल्याचे देखील संकेत दिले होते. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकीपटू गोलंदाज रवीचंद्रन अश्विनला संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, चौथ्या कसोटी सामन्यात देखील अश्विनला संधी देण्यात आली नाही. यावर अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केले.
आतापर्यंत झालेल्या तीनही कसोटी सामन्यात अश्विनला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याऐवजी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला तिन्ही सामन्यात संधी देण्यात आली होती. तसेच चौथ्या कसोटी सामन्यातही तो खेळत आहे.
चौथ्या सामन्यादरम्यान अश्विनला संघात न घेण्याचे कारण विचारले असता त्यावर कोहली म्हणाला, “इंग्लंडच्या फलंदाजी विभागात ४ डावखुरे फलंदाज आहेत. यासाठी जडेजा फिरकीपटू गोलंदाज म्हणून वेगवान गोलंदाजांनासह योग्य आहे. त्यामुळे, त्याला संघात स्थान दिले. तसेच तो ७व्या क्रमांकावर फलंदाजीत मोठे योगदान देऊन, फलंदाजीत मजबुती आणू शकतो.”
दरम्यान चौथ्या कसोटी सामन्यासाठी अश्विनची निवड होईल अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र, कोहली आणि संघ व्यवस्थापकांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे अश्विनला सामना खेळण्यासाठी अजून वाट पहावी लागू शकते.
अश्विन हा भारतीय संघातील अनुभवी फिरकीपटू गोलंदाज आहे. भारताच्या अनेक आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी अश्विनला संघात स्थान देण्याचे देखील सुचवले होते. मात्र कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापक यांनी खेळपट्टीवरील परिस्थिती पाहता जडेजाला कायम ठेवले आहे. तर, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा ऐवजी उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांना चौथ्या कसोटीसाठी अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आले आहे.
दोन्ही संघ सध्या या मालिकेत १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे चौथा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ –
रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), ओली पोप, जॉनी बेयरस्टो, मोइन अली, क्रिस वोक्स, क्रेग ओव्हरटन, ओली रोबिन्सन, जेम्स अँडरसन,
महत्वाच्या बातम्या –
–‘वेडेपणा’! आर अश्विनला चौथ्या कसोटीत संधी न दिल्याने दिग्गजांकडून भारतीय संघव्यवस्थापनेवर टीकास्त्र
–एवढा भारी रेकाॅर्ड आता जेम्स अँडरसनच्या नावावर झालाय, आधी सचिनचं होतं ‘या’ विक्रमावर राज्य
–ओव्हल कसोटीत भारतीय संघ उतरला दंडाला काळी पट्टी बांधून; ‘हे’ आहे कारण