उद्यापासून(22 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेने भारत आणि वेस्ट इंडीज संघ कसोटी चॅम्पियनशीपमधील त्यांच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडीज संघाचे क्रिकेटपटू क्रमांक आणि नाव असलेली जर्सी घालून ही कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. ही नवीन कसोटी जर्सी घालून केलेल्या फोटोशूटचे फोटो बीसीसीआयने तसेच भारतीय खेळाडूंनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, केएल राहुल या खेळाडूंचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत. भारतीय संघातील जवळ जवळ सर्वच खेळाडूंनी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये वापरत असलेले जर्सी क्रमांकच कसोटीसाठीही कायम ठेवले आहेत.

क्रमांक आणि नाव जर्सीवर असल्याने चाहत्यांना खेळाडू लवकर ओळखता येतील आणि चाहते खेळाडूंशी जोडले जातील, म्हणून कसोटी चॅम्पियनशीपमध्ये क्रमांक आणि नाव असलेली कसोटी जर्सी घालण्यात यावी, असा आयसीसीने पुढाकार घेतला आहे.

2 वर्षे चालणारी ही कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा आयसीसीचे कसोटी सदस्य असणाऱ्या 12 देशांपैकी 9 देशांच्या संघात पार पडणार आहे. यामध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या 9 देशांचा समावेश आहे.

या संपूर्ण स्पर्धेत एकूण 27 द्विपक्षीय मालिका होणार आहेत. तर एकूण 71 कसोटी सामने होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना जून 2021 मध्ये लॉर्ड्सवर पार पडणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–श्रीसंत पुन्हा दिसणार मैदानावर, बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय
–पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली या भारतीय मुलीबरोबर अडकला लग्नबंधनात
–…म्हणून ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या जर्सीच्या कॉलरवर आहे हे सोनेरी फुल, जाणून घ्या कारण






