लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरु झाला आहे. या सामन्यादरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मोठा विश्वविक्रम झाला आहे.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाज गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण भारताने केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या विकेट्स लवकर गमावल्याने विराटला १४ व्या षटकातच फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले.
यावेळी विराटने १३ वा चेंडू खेळताना जेम्स अँडरसनविरुद्ध चौकार ठोकत त्याच्या धावांचे खाते उघडले. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला. त्याने ४४० वा सामना खेळताना आणि ४९० व्या डावात फलंदाजी करताना हा कारनामा केला आहे. तसेच त्याच्या नावावर आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके आणि ११६ अर्धशतके आहेत.
दिग्गजांच्या यादीत समावेश
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट भारताचा तिसरा खेळाडू, तर जगातील ७ वा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर (३४३५७) आणि राहुल द्रविड(२४२०८) या भारतीयांनी हा पराक्रम केला आहे. तसेच कुमार संगकारा(२८०१६), रिकी पाँटिंग(२७४८३), माहेला जयवर्धने(२५९५७) आणि जॅक कॅलिस(२५५३४) यांनीही २३ हजारांपेक्षा अधिक धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या आहेत.
जलद २३ हजार धावा करणारा फलंदाज
याशिवाय विराट हा सर्वात जलद २३ हजार धावा करणारा फलंदाजही बनला आहे. त्याने हा विक्रम करताना सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने ५२२ व्या आंतरराष्ट्रीय डावात २३ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विराटने २३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी सचिनपेक्षा तब्बल ३२ डाव कमी घेतले आहेत. या यादीत विराट आणि सचिन पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंग आहे. त्याने ५४४ डावात २३ हजार धावांचा टप्पा पार केला होता.
https://twitter.com/BCCI/status/1433397241025339395
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २३ हजार धावा करणारे फलंदाज
४९० डाव – विराट कोहली
५२२ डाव – सचिन तेंडुलकर
५४४ डाव – रिकी पाँटिंग
५५१ डाव – जॅक कॅलिस
५६८ डाव – कुमार संगकारा
५७६ डाव – राहुल द्रविड
६४५ डाव – माहेला जयवर्धने
महत्त्वाच्या बातम्या –
पदार्पणाचीच तयारी समजा, अर्जुनची सराव सत्रातील गोलंदाजी अगदी बुमराह, मलिंगालाही देतेय टक्कर!