टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची शेवटची आशा अफगाणिस्तानकडून होती. परंतु अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. गट २ मधील या सर्वात महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयानंतर भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीचे एक जुने ट्विट खूप व्हायरल होत आहे. यामध्ये तो घरी जाण्याबाबत बोलत आहे. चाहत्यांनी हे जुने ट्विट शोधून काढत, त्याला ट्वीटर शेअर केले आहे.
विराट कोहलीने २०१२ मध्ये आशिया चषकामधील खराब कामगिरीनंतर एक ट्विट केले होते. यात त्याने म्हटले होते की, ‘मी उद्या घरी जात आहे, माझी तब्येत ठीक नाही.’ आता उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर याचाच संदर्भ घेऊन हे ट्विट व्हायरल होत आहे. चाहते याला लाईक आणि रिट्विट करत आहेत. कोहलीचे हे ट्विट चाहत्यांनाही मजेदार वाटत आहे.
going home tomorrow. not a good feeling .
— Virat Kohli (@imVkohli) March 20, 2012
मात्र, नामिबियाविरुद्ध शेवटचा सामना खेळून भारतीय संघाला मायदेशी परतावे लागणार आहे. नामिबियाविरुद्धचा सामना सोमवारी (८ नोव्हेंबर) होणार आहे. भारतीय संघ हा सामना जिंकत विजयाने आपल्या मोहिमेचा शेवट करू इच्छित असेल.
भारतीय संघाला सुरुवातीला दोन पराभवांचा फटका सहन करावा लागला. न्यूझीलंड, पाकिस्तानविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारतीय संघ या विश्वचषकातून बाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. यानंतर अफगाणिस्तान आणि स्कॉटलँडवरील विजयांनी नेट रन रेट सुधारल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या आशा उंचावल्या होत्या. पण अफगाणिस्तानच्या न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर सर्व काही संपुष्टात आले आहे.
स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यानंतर रवींद्र जडेजाला विचारण्यात आले होते की, अफगाणिस्तान संघ न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हरला तर काय होईल? यावेळी जडेजाने स्पष्ट शब्दात सांगितले की, ‘आम्ही आमच्या बॅगा बांधून आमच्या घरी जाऊ.’ आता तेच होणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत चार सामने खेळले असून दोन सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून संघाला बाहेर पडावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
खत्म टाटा बाय बाय..! अफगाणिस्तानवर न्यूझीलंडचा विजय अन् टीम इंडियावरील मीम्सचा सोशल मीडियावर पूर
सातत्यपूर्ण बाबर! विश्वचषकात लगावले चौथे अर्धशतक; नावे केले आणखी विक्रम
“द्रविड प्रशिक्षक बनला तरी टीम इंडियात बदल होणार नाही”