भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळला गेलेला तिसरा टी२० सामना ऑस्ट्रेलियाने १२ धावांनी आपल्या नावे केला. भारत या सामन्यात पराभूत झाला असला तरी, भारताने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेवर २-१ अशा फरकाने कब्जा केला. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेले १८७ धावांचे लक्ष्य पार करताना, भारतीय कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची खेळी करत भारताकडून एकाकी झुंज दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाज असलेल्या विराटने आपले हे स्थान अधिकच भक्कम केले आहे.
ऑस्ट्रेलियाने राखला अखेरच्या सामन्यात सन्मान
पहिल्या दोन टी२० सामन्यात पराभूत झालेल्या, यजमान ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा धावफलकावर लावल्या. ऑस्ट्रेलियाकडून अनुभवी मॅथ्यू वेडने ८० धावांची लाजवाब खेळी केली. तुफान फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने स्फोटक अंदाजात ५४ धावा काढून ऑस्ट्रेलियन धावसंख्येला आकार दिला. भारताकडून ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने २ बळी आपल्या नावे केले. टी नटराजन व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्याला साथ दिली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८७ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काहीशी निराशजनक झाली. उपकर्णधार केएल राहुल शून्यावर माघारी परतला. त्यानंतर, कर्णधार विराट कोहली व सलामीवीर शिखर धवन यांनी भारताचा डाव सावरला. परंतु, लेगस्पिनर स्वॅपसनने तीन षटकात तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाला सामन्यात परत आणले. विराट व अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी काही आक्रमक फटके मारत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. मात्र, दोघेही लागोपाठच्या षटकात बाद झाल्याने भारताला १२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
कोहलीचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘विराट’ प्रदर्शन
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची सुरेख खेळी साकारली. त्याच्या खेळीत ५ चौकार व ३ दर्शनीय षटकारांचा समावेश होता. आपल्या ८५ धावांच्या खेळीत दरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ६८१ धावा पूर्ण करण्याची किमया केली. यासाठी त्याने अवघे १८ डाव घेतले. विशेष म्हणजे या यादीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या शिखर धवनपेक्षा या धावा दुप्पट आहेत. शिखरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ टी२० डाव खेळत ३४० धावा जमवल्या आहेत.
या दिग्गजांचा यादीत समावेश
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीयांमध्ये रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३१८ टी२० धावा काढण्यासाठी १६ डाव खेळले आहेत. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी १५ डावातील ३१३ धावांसह या यादीत चौथ्या स्थानी दिसून येतो.
विराटच्या नावे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ टी२० अर्धशतके आहेत. जी अन्य कोणत्याही फलंदाजापेक्षा जास्त आहेत. त्याची आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या (९०) देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध आली आहे.
संबंधित बातम्या:
– INDvsAUS: स्वेप्सनने वाचवला ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप, तिसऱ्या टी२० सामन्यात भारत १२ धावांनी पराभूत
– विराटचा आणखी एक कारनामा! आता केली ही खास कामगिरी
– भारत अ संघ पराभवापासून थोडक्यात बचावला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिला सराव सामना अनिर्णीत