भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी(१६ सप्टेंबर) मोठी घोषणा केली आहे. विराटने भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत माहिती दिली की टी२० कर्णधार म्हणून यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमान येथे होणारा टी२० विश्वचषक त्याची अखेरची स्पर्धा असेल. त्यानंतर तो केवळ वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करेल.
विराटने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘भारताचे प्रतिनिधित्वच नाही, तर भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करायला मिळाल्याबद्दल मला भाग्यवान समजतो. मी त्या सर्वांचे आभार मानतो, ज्यांनी मला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून माझ्या प्रवासात पाठिंबा दिला. संघसहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समीती, माझे प्रशिक्षक आणि प्रत्येत भारतीय, ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रार्थना केली, त्या सर्वांशिवाय मी काही करु शकलो नसतो.’
त्याचबरोबर ३३ वर्षीय विराट पुढे म्हणाला, ‘तुमच्यावरील कामाचा ताण लक्षात घेणं महत्त्वाचं असतं आणि मी गेले ८-९ वर्षे तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळत आहे आणि गेले ५-६ वर्षे नेतृत्व करत आहे. त्यामुळे मला वाटते की मी स्वत:ला भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी पूर्ण सज्ज होण्यास वेळ द्यायला हवा.’
‘मी माझ्या टी२० कर्णधारपदाच्या काळास संघासाठी सर्वकाही दिले आहे आणि यापुढेही एक फलंदाज म्हणून मी टी२० संघाला माझे सर्वोत्तम देत राहिल,’ असेही विराट म्हणाला आहे.
विराटने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की त्याने हा निर्णय घेताना जवळच्या लोकांशी, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सध्याचा टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माशी चर्चा केली आहे. तसेच त्याने बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांना देखील निर्णय कळवला आहे. त्यामुळे विराट टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर भारताच्या टी२० संघात केवळ एक फलंदाज म्हणून खेळेल.
🇮🇳 ❤️ pic.twitter.com/Ds7okjhj9J
— Virat Kohli (@imVkohli) September 16, 2021
विराट २०१७ पासून भारताच्या टी२० संघाचा नियमित कर्णधार होता. त्याने ४५ टी२० सामन्यांत भारताचे नेतृत्व केले असून यामध्ये त्याला २७ विजय मिळले आहेत. तसेच १४ सामन्यांत पराभव स्विकारावा लागाल आहे. त्याचबरोबर २ सामने बरोबरीत सुटले असून २ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकाआधी विराटसमोर चार मोठे यक्षप्रश्न, शोधावी लागतील उत्तरे
नेपाळच्या रोहितने सीमारेषेजवळ घेतला अविश्वसनीय झेल, आयसीसीने केला व्हिडिओ शेअर
प्रतिभेची कमी नाही! आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात ‘हे’ ३ अनकॅप्ड खेळाडू गाजवू शकतात युएईची मैदानं