11 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण केले होते. तसेच भारताला दुसऱ्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिला होता.
2008 ला झालेल्या या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध झाला होता. या सामन्यात भारताने डकवर्थ लूईस नियमाप्रमाणे 12 धावांनी विजय मिळवला होता.
या विश्वचषकात भारताकडून खेळलेल्या काही खेळाडूंनी भारताच्या वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व केले. तर काहींनी क्रिकेट व्यतिरिक्त अन्य क्षेत्रांचा मार्ग निवडला.
2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळलेले खेळाडू सध्या काय करतात, वाचा-
विराट कोहली- 19 वर्षांखालील भारतीय संघातून सुरु झालेला विराटचा प्रवास आज भारताच्या वरिष्ठ संघाचा कर्णधार इथपर्यंत झाला. तो क्रिकेट जगतात सध्याचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून ओळखला जोतो. तसेच त्याने अनेक मोठे विश्वविक्रमही आपल्या नावावर केले आहेत.
रविंद्र जडेजा – 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार असणाऱ्या रविंद्र जडेजानेही वरिष्ठ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. तो सध्या भारताच्या कसोटी संघाचा नियमित सदस्य असून त्याने आत्तापर्यंत 39 कसोटी, 144 वनडे आणि 40 टी20 सामने खेळले.
तसेच तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लायन्स, कोची टकर्स केरला आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे.
अजितेश अरगल – अजितेश हा 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरला होता. त्याने पाच षटकात 7 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आता तो क्रिकेट खेळत नाही. तो सध्या वडोदरामध्ये आयकर विभाग निरीक्षक आहे.
नेपोलियन आइनस्टाईन – नावामुळे प्रसिद्ध झालेल्या नेपोलियनला 2008 मध्ये विश्वचषकानंतर चेन्नई सुपस किंग्जने आयपीएलच्या पहिल्या मोसमासाठी संघात घेतले होते. मात्र त्याच्याबद्दल आणखी माहिती उपलब्ध नाही. पण काही रिपोर्टनुसार तो आता प्रोफेशनल क्रिकेट खेळत नाही.
श्रीवत्स गोस्वामी – यष्टीरक्षक फलंदाज असलेला श्रीवत्स गोस्वामीला वरिष्ठ भारतीय संघात जागा मिळालेली नाही. पण त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैद्राबाद संघाने प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाकडून खेळत असून त्याची कामगिरीही चांगली झाली आहे.
पेरी गोयल – 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात पेरी गोयलला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यष्टीरक्षक फलंदाज असणाऱ्या गोयलने या स्पर्धेनंतर मॅनेजमेंटमध्ये करियर करण्यासाठी क्रिकेट खेळणे सोडले. तो सध्या आरएसजी प्रोपर्टीज नावाच्या कंपनीमध्ये संचालक आहे.
इक्बाल अबदुल्ला – इक्बालने या विश्वचषकात 13 च्या सरासरीने 10 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळला. पण 2016 मध्ये तो केरळ संघाकडे गेला. त्याने आय़पीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
सिद्धार्थ कौल – मध्यमगती गोलंदाज असणाऱ्या सिद्धार्थ कौलने मागील वर्षीच भारताच्या वरिष्ठ संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने भारताकडून 3 वनडे आणि 2 टी20 सामने खेळले आहेत.
तसेच तो पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळतो. आयपीएलमध्ये सिद्धार्थने दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकता नाईट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैद्राबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
तरुवार कोहली – पंजाबचा असणाऱ्या तरुवार कोहली विश्वचषकानंतर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला. त्यानंतर तो 2009 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला. तसेच त्याने पंजाबकडून खेळताना 2012-13 च्या मोसमात रणजी ट्रॉफीमध्ये झारखंड विरुद्ध त्रिशतक केले होते. तो 2018-19 च्या मोसमात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मिझोरम संघाकडून खेळला.
अभिनव मुकुंद – अभिनवला 19 वर्षांखालील विश्वचषकानंतर भारताच्या वरिष्ठ संघाकडून संधी मिळाली होती. त्याला 2011 मध्ये इंग्लंड आणि विंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी मिळाली होती. पण तो या दौऱ्यात अपयशी ठरल्याने त्याला संघातून वगळण्यात आले. 2017 मध्ये त्याला पुन्हा भारतीय संघाकडून संधी देण्यात आली होती.
तसेच अभिनव हा तमिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असून त्याने दक्षिण विभाग, भारत अ आणि शेष भारत संघाकडूनही खेळला आहे.
मनिष पांडे – मनिषसाठी 2008 चा विश्वचषक जरी चांगला ठरला नसला तरी त्याला भारताकडून 23 वनडे आणि 25 टी20 सामने खेळण्याती संधी मिळाली. तसेच त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर्स हैद्राबाद, कोलकता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स, कोलकता नाईट रायडर्स संघाकडून खेळला आहे. त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
प्रदिप सांगवान – प्रदिप सध्या दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. तसेच तो आयपीएलमध्येही दिल्ली डेअरडेविल्स, गुजरात लायन्स, कोलकता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. मात्र 2013 मध्ये ड्रग्स घेतल्याने त्याच्यावर दिडवर्ष बंदी घालण्यात आली होती.
दुवारापू शिवा कुमार – अष्टपैलू असणाऱ्या दुवारापू हा अजूनही आंध्रप्रदेशकडून खेळत असून त्याने आत्तापर्यंत 42 प्रथम श्रेणी सामन्यात 133 विकेट्स आणि 1061 धावा केल्या आहेत. तसेच 30 अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 40 सामने खेळले असून 45 विकेट्स आणि 522 धावा केल्या आहेत.
तन्मय श्रीवत्सा – 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात त्याने 262 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र त्याची अशी कामगिरी त्याच्या पुढील कारकिर्दीत न झाल्याने त्याला मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळाली नाही. पण तो सध्या उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे.
सौरभ तिवारी – सौरभला भारताच्या वरिष्ठ संघाकडून 3 वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. तसेच त्याला 2010 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने संघात घेत आयपीएलमध्ये संधी दिली. तिवारी सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडकडून खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या-
–बीसीसीआयने विंग कमांडर अभिनंदन यांना दिली क्रमांक १ ची जर्सी
–आणि संकटात सापडलेल्या केएल राहुलला केली राहुल द्रविडने मदत
–टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे झाले अनावरण, पहा फोटो