विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा थरार सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान हा सामना साउथम्प्टनमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयसीसी या अंतिम सामन्याचे जोरदार आयोजन करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच दोन्ही संघ जेतेपद मिळवण्यासाठी कसून मेहनत घेताना दिसून येत आहेत. चाहत्यांना या मोठ्या सामन्यापूर्वी अनेक प्रश्न पडले असतील. जसे, या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला किती बक्षीस मिळेल?
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्या संघाला मिळणारी बक्षिसाची रक्कम ही विराट कोहलीच्या आयपीएलच्या मानधनापेक्षाही कमी आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवणाऱ्या संघाला तब्बल ११.७२ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला ५.८५ कोटी रुपये देण्यात येणार आहे. परंतु विजेत्या संघाच्या बक्षीस रक्कमेपेक्षा विराटची केवळ आयपीएलची पगार ही जवळपास ५ कोटी रुपये अधिक आहे. विराट कोहलीला आयपीएलच्या एका हंगामात तब्बल १७ कोटी रुपये मानधन दिले जाते. तसेच बीसीसीआयकडूनही विराट कोहलीला दरवर्षी ७ कोटी रुपये इतके मानधन दिले जाते.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, जर हा सामना अनिर्णीत राहिला तर, दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना समान बक्षिसाची रक्कम दिली जाईल. त्यानुसार दोन्ही संघांना ८.७८ कोटी रुपये मिळतील. यासोबतच आयसीसीतर्फे विजेत्या संघाला गदादेखील देण्यात येणार आहे.
तसेच तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला ३.३ कोटी मिळणार आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड संघाला २.५ कोटी आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तान संघाला १.५ कोटी मिळणार आहेत. याखेरीज उर्वरित ४ संघांना ७३-७३ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात २०१९ मध्ये झाली होती. ज्यामध्ये आयसीसीने ९ संघांना स्थान दिले होते. सर्व संघांना ६-६ मालिका खेळण्याची संधी दिली गेली होती. यामध्ये त्यांना तीन मालिका या मायदेशात खेळायचा होत्या, तर ३ मालिका परदेशात जाऊन खेळायच्या होत्या. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमात अनेक फेरबदल करण्यात आले. यामध्ये भारतीय संघ प्रथमस्थानी होता. तर न्यूझीलंड संघ दुसऱ्या स्थानी होता. वर्ष २०२३ पासून ते २०३१ पर्यंत, आयसीसी अशा ४ स्पर्धांचे आयोजन करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लिटल मास्टरच्या मते, ६०-७०चे दशक गाजवणारे ‘ते’ दिग्गज आजही जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू
कर्णधार विलियम्सन कसोटीचा अंतिम सामना खेळणार का? दुखापतीबाबत आली महत्त्वाची अपडेट
डेविडने भारतीय संघाला केले ‘वॉर्न’; सांगितले, WTC अंतिम सामन्यात ‘हा’ अष्टपैलू हवाच