शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला 2026 मधील पहिल्याच एकदिवसीय मालिकेत पराभवाचा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली होती. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. त्यामुळे रविवारी 18 जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगलेला तिसरा आणि निर्णायक सामना अत्यंत महत्त्वाचा ठरला. मात्र या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 41 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि मालिका हातातून निसटली.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 338 धावांचं आव्हान उभं केलं. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली, मात्र मधल्या फळीत सातत्याने पडलेल्या विकेट्समुळे दबाव वाढत गेला. अखेरीस भारताला 50 षटकांत 296 धावांपर्यंतच मजल मारता आली.
या पराभवातही विराट कोहलीने निर्णयाक खेळी खेळली. अनुभवी विराटने जबाबदारी स्वीकारत झुंजार शतकी खेळी केली. त्याने 108 चेंडूत 124 धावा करत भारताला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. या खेळीत विराटच्या बॅटमधून 10 चौकार आणि 3 षटकार पाहायला मिळाले. मात्र दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने विराटचं शतक अखेर व्यर्थ ठरलं.
हे शतक विराटसाठी खास ठरलं. 2026 सालातील हे त्याचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक होतं. इतकंच नव्हे, तर या तीन सामन्यांच्या मालिकेत विराटने जबरदस्त सातत्य राखत 80 च्या सरासरीने एकूण 240 धावा केल्या. या मालिकेत विराटने एकामागोमाग एक असे सहा मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
या मालिकेदरम्यान विराट कोहलीने सर्वात वेगवान 28 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला. त्याने 624 डावांत हा टप्पा गाठत सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांनाही मागे टाकलं. याशिवाय विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला असून तो सध्या जगातील अव्वल सक्रिय फलंदाज आहे.
इंदूरच्या सामन्यातील शतकासह विराटने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक सात वनडे शतकांचा विक्रम केला. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक वनडे धावा करणाऱ्यांच्या यादीतही तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 10 शतकं करणारा फलंदाज होण्याचा मानही विराटने पटकावला.
जरी मालिका भारताच्या हातून गेली असली, तरी विराट कोहलीची कामगिरी ही या मालिकेची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे.






