इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले येथे खेळला गेला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने पुनरागमन केले होते. मात्र, चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचे सर्व आठही गडी बाद झाल्याने यजमान इंग्लंडने एक डाव आणि ७६ धावांनी मोठा विजय साजरा केला. यासह मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. भारतीय संघाच्या पराभवामुळे कर्णधार विराट कोहली एका नकोशा यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.
नकोशा यादीत विराट दुसऱ्या स्थानी
हेडिंग्ले कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने केवळ ६३ धावांमध्ये आपले उर्वरित आठ गडी गमावले. यासह इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधली. या पराभवामुळे कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावे कसोटीत सेना देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया) तेरा पराजय जमा झाले. तो सेना देशांमध्ये सर्वाधिक पराभव पत्करणार्या भारतीय कर्णधारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला.
धोनी अव्वल स्थानी कायम
सेना देशांमध्ये कसोटीत सर्वाधिक पराभव पत्करण्याचा नकोसा विक्रम दिग्गज कर्णधार एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत सेना देशांमध्ये सर्वाधिक १४ पराभव स्वीकारले होते. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी असलेल्या मोहम्मद अजहरुद्दिन यांच्या नेतृत्वात भारताला सेना देशांमध्ये ९ पराभव पहावे लागले होते.
भारताचा दारुण पराभव
लॉर्ड्स कसोटी शानदार पद्धतीने जिंकल्यानंतर भारतीय संघ या सामन्यात विजयाच्या उद्देशाने उतरला होता. मात्र, इंग्लंडच्या भेदक गोलंदाजांनी भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर गुंडाळला. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने पुन्हा एकदा शानदार शतक झळकावत इंग्लंडला ३५४ धावांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाखेर २ बाद २१५ धावा करत पुनरागमन केले होते. मात्र, चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारताचे उर्वरित आठ गडी बाद झाल्याने भारताला एक डाव आणि ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
आरारा खतरनाक! इंग्लंडच्या क्रिकेटरने पुढे सरसावत एका हाताने ठोकला गगनचुंबी षटकार