इंग्लंडचा भारत दौरा शुक्रवारी (२८ मार्च) पूर्ण झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला तिन्ही प्रकारच्या मालिकांत मात देत व्हाईटवॉश दिला. या विजयासह भारतीय संघाने १० वर्षापूर्वीच्या पराभवाचा बदला घेतला. त्यावेळी दिग्गजांचा भरणा असलेल्या भारतीय संघाचा पराभव इंग्लंडने केला होता. मात्र, या वेळी भारताच्या अनुनभवी संघाने इंग्लंडला पाणी पाजले. अशा प्रकारे एक वर्तुळ पूर्ण झाले.
भारतीय संघाने केली होती लाजिरवाणी कामगिरी
भारतीय संघाने २०११ मध्ये वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर ‘विश्वविजेते’ म्हणून इंग्लंडचा दौरा केला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ त्या दौऱ्यावर ४ कसोटी, १ टी२० व ५ वनडे सामने खेळला. भारताची त्या संपूर्ण दौऱ्यावर दुर्दशा झाली. संघाला चारही कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला. तर, एकमेव टी२० सामन्यातही इंग्लंडनेच बाजी मारली. दौऱ्याच्या अखेरीस वनडे मालिका यजमानांनी ३-० अशी खिशात घातली. मालिकेतील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता तर, एक सामना बरोबरीत सुटलेला. संपूर्ण दौर्यावर भारत एकही सामना जिंकू शकला नव्हता.
…आणि वर्तुळ पूर्ण झाले
सध्या इंग्लंडचा संघ विश्वविजेता आहे. हे बिरुद घेऊनच इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला होता. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत चांगली सुरुवात केली. मात्र, पुढील तीन सामन्यात भारतीय संघाने विजयश्री मिळवली. टी२० मालिकेतही इंग्लंडनेच आघाडी घेतलेली. परंतु, अखेरचे दोन सामने खिशात घालत भारतीय संघाने ३-२ ने मालिका आपल्या नावे केली. अटीतटीच्या ठरलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने अखेरचा रोमहर्षक सामना ७ धावांनी जिंकत २-१ अशी मालिका जिंकली. याचसोबत भारताने व्हाईट वॉश पूर्ण केला.
पाच वर्षांपूर्वीही दिलेला व्हाईट वॉश
इंग्लंड संघाने २०१६ मध्येही भारताचा दौरा केलेला. त्यावेळीही ते एकही मालिका जिंकू शकले नव्हते. त्यावेळी भारतीय संघाने ५ सामन्याची कसोटी मालिका ४-० अशी आपल्या नावे केली होती. वनडे मालिकेत २-१ अशी भारतीय संघाने सरशी साधलेली. तीन टी२० सामन्यांची मालिका ही भारतीय संघाने २-१ ने जिंकलेली. मात्र, त्यावेळी इंग्लंड विश्वविजेता नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ : “मोहाला करा मित्र आणि…”, आयपीएलच्या जाहिरातीत दिसला रोहित शर्माचा हटके अंदाज
कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाबद्दल भुवनेश्वर कुमार म्हणाला, ‘माझे ध्येय कसोटीमध्ये परत येणे आहे, पण…