भारत आणि इंग्लंड यांच्यात, सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील, पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात भारतीय संघातील मुख्य फलंदाजांना धावा करण्यात अपयश आले होते. या पराभवानंतर भारतीय संघातील माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय संघाच्या रणनितिवर निराशा व्यक्त केली आहे. तसेच रिषभ पंतचे उदाहरण देत भारतीय संघाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने क्रिकबझशी बोलताना भारतीय संघाच्या रणनितीवर निराशा व्यक्त करत म्हटले आहे की, “मला वाटते की, भारतीय संघाकडून जे भाष्य करण्यात आले होते, त्यामध्ये आणि जे मैदानात घडलं, या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. यापूर्वी त्यांनी सांगितले होते की, ते रिषभ पंतला पाठिंबा देणार, परंतु असे काही केले नाही आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून त्याला संघाबाहेर केले होते. जेव्हा त्याने कसोटी क्रिकेटमध्ये धावा केल्या. तेव्हा म्हटले गेले की, तो फिट आहे आणि चांगला खेळ करत आहे. तर आम्ही त्याला संघात संधी देऊ ”
तसेच सेहवाग पुढे म्हणाला,” आता म्हटले जात आहे की, आम्ही पंतला आक्रमक होऊन खेळण्याचे स्वतंत्र देऊ. परंतु, असेच सुरू राहिले आणि पुन्हा एकदा दोनदा तो २३ चेंडू खेळत २१ धावा करत माघारी परतला तर पुन्हा त्याला संघाबाहेर केले जाईल.” पंतने पहिल्या टी२० सामन्यात २३ चेंडूत २१ धावा केल्या होत्या
तसेच सेहवागच्या मते, भारतीय संघातील मुख्य फलंदाजांना चांगली सुरुवात करण्यात अपयश आले तर, रिषभ पंतला आक्रमक होऊन खेळणे कठीण होऊन जाईल. पहिल्या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. सलामीला आलेल्या केएल राहुल आणि शिखर धवन यांना चांगली सुरुवात करून देण्यात अपयश आले होते.
राहुल (१) तर तर शिखर (४) धावा करत माघारी परतला होता. कर्णधार विराट कोहली या सामन्यात देखील (०) धावा करत माघारी परतला. यामुळे हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांच्यावर धावा करण्याचा तणाव आला होता. त्यामुळे हे फलंदाज मोठे फटके खेळताना बाद झाले. तसेच या सामन्यात श्रेयस अय्यरने सर्वाधिक (६७) धावांची खेळी केली होती.