माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीने आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ मोठे कारनामे केले. सुरुवातीच्या काळात तो जेव्हा फलंदाजीला यायचा त्यावेळी त्याच्या फलंदाजीची चर्चा रंगायची. त्याची फलंदाजी पाहायला इतकी आकर्षक नाही वाटायची तरी देखील या खेळाडूने फलंदाजीमध्ये अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने एमएस धोनीच्या फलंदाजीबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
एमएस धोनीने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. त्याची आक्रमक फलंदाजी शैली आणि आक्रमक फटकेबाजीची चाहते आतुरतेने वाट पाहत असत. अशातच एमएस धोनीच्या फलंदाजीबाबत बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, “मला भारत विरुध्द भारत अ यांच्यात एमएस धोनी विरुद्ध झालेला सामना अजूनही लक्षात आहे. धोनी भारत अ संघासाठी खेळत असताना, पुलचा फटका मारण्याच्या नादात बाद झाला होता. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण होण्यापूर्वी झाले होते. एक कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी आम्ही सराव सामने खेळत होतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “तो बाद झाल्यानंतर, अनेक वरिष्ठ खेळाडूंनी सांगितले की, तो एक अनियंत्रित हुकर आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो यशस्वी होऊ शकत नाही. पण मी एकटाच होतो ज्याचा असा विश्वास होता की जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही खूप चांगले नव्हतो पण जसजसे आम्ही खेळत गेलो, तसे आमच्यात बदल आले. मला वाटले की जर संधी मिळाली तर तो नक्कीच चांगला होऊ शकेल.”
तो पुढे म्हणाला, “नॉर्थ आणि वेस्ट झोन यांच्यातील दुलीप ट्रॉफी १९९९ अंतिम सामन्यात मी पारस म्हांब्रेच्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर बाद झालो होतो. तेव्हाही लोक म्हणायचे की, मी असे फटके खेळू शकत नाही. मग मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसा टिकेल. पण मी अडचणींवर मात केली आणि क्रिकेट विश्वात मान मिळवला. एमएस धोनीच्या बाबतीत मी माझ्या कथेची पुनरावृत्ती होताना पाहत होतो. म्हणूनच मी त्याला पाठिंबा दिला.”