इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात गेल्या १३ हंगामात एकदाही जेतेपद न मिळवू शकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएलच्या १४ व्या हंगामात चांगली सुरुवात केली होती. परंतु २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले आहेत. अशातच माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला एक सल्ला दिला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या हंगामात आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. यात त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाज धावा करण्यास अपयशी ठरले होते. या हंगामात कर्णधार विराट कोहली संघाच्या डावाची सुरुवात करत आहे. परंतु त्याला मोठ्या धावा करण्यात अपयश येत आहे. अशातच माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मोलाचा सल्ला देत फलंदाजी क्रमात बदल करण्यास सांगितले आहे.
विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी
वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “मला असे वाटते की, विराटने सलामी फलंदाजी सोडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी यावे. सलामी फलंदाजीसाठी त्याने मोहम्मद अजहरुद्दीनला संधी देण्याचा विचार करावा. यावेळी देवदत्त पडीक्कल संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. विराटने तिसऱ्याच क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी यावे. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिविलियर्सने फलंदाजीसाठी यावे. या फलंदाजी क्रमामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला फायदा होऊ शकतो. कारण मोहम्मद अजहरुद्दीन आणि देवदत्त पडीक्कल हे सलामीला आले तर कोहली, मॅक्सवेल आणि डिविलियर्स हे तीनही विश्वातील सर्वश्रेष्ठ फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये असतील.”
मोहम्मद अजहरुद्दीनची कारकीर्द
नुकत्याच पार पडलेल्या सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत केरळच्या या फलंदाजाणे, आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याने या स्पर्धेत एकूण ५ सामन्यात ५३ च्या सरासरीने एकूण २१४ धावा केल्या होत्या. यात त्याने १५ षटकार लगावले होते. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण २२ सामने खेळले आहेत. यात त्याने २५.९ च्या सरासरीने ९५९ धावा केल्या आहेत. यात ५ अर्धशतक आणि १ शतकाचा समावेश आहे. तसेच ३० लिस्ट ए सामन्यात त्याने २५.४ च्या सरासरीने ५८५ धावा केल्या होत्या. यात त्याने ५ अर्धशतक झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
RR vs SRH Live: जोस बटलरचा शतकी तडाखा! राजस्थानचे हैदराबादसमोर विजयासाठी २२१ धावांचे मोठे आव्हान
बिग ब्रेकिंग! केएल राहुल ‘या’ गंभीर आजारामुळे बेजार; आयपीएल २०२१ मधून होऊ शकतो बाहेर
जोस नव्हे फुल ‘जोश’! हैदराबादविरुद्धच्या सामन्यात बटलरचे वादळी आणि विक्रमी शतक; ठरला चौथाच खेळाडू