पुणे । एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलाजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभारे यांच्यातर्फे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन विश्वनाथ स्पार्टस् मीट २०१८चे शानदार उद्घाटन प्रमुख पाहुणे खासदार दुष्यंत चौटाल, ऑलम्पियन कुस्तीपटू नरसिंग यादव, जागतिक शरीरसौष्ठव्य विजेते महेंद्र चव्हाण आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड यांच्या हस्ते झाले.
यावेळी एमआयटी- एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे आयसीटी विभागाच्या संचालिका प्रा. सुनिता मंगेश कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील राय, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश देशपांडे, विश्वनाथ स्पार्टस् मीट २०१८ च्या नियोजन समितीचे अध्यक्ष प्रा. सुबोध देवगावकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड आदी उपस्थित होते. दरम्यान फुटबॉल सामन्याची सुरुवात आणि एलइडी स्क्रीनच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे खासदार दुष्यंत चौटाला यांनी विश्वनाथ स्पोर्टस् मीट 2018 चे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे खासदार दुष्यंत चौटाला म्हणाले की, एमआयटी- एडीटी विद्यापीठ खेळाला प्रोत्साहन देऊन वेगवेगळ्या खेळ प्रकारातील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करते ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ऑलम्पियन खेळासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा एमआयटी एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांना ही संधी आहे. विश्वनाथ स्पोर्टस् मीटचे हे दुसरे वर्ष असले तरी आगामी काळात हे विद्यापीठ देशात खेळाला महत्व देणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे आदर्श ठरेल. एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी शिक्षण क्षेत्रासाठी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्ष झाले आहे. शिक्षणाबरोबरच खेळाला महत्व देणाऱ्या विद्यापीठात एमआयटी एडीटी विद्यापीठ अग्रस्थानी आहे. सागरी शिक्षण केवळ सरकारच देते असे वाटत होते, मात्र एमआयटी सारख्या शिक्षण क्षेत्रात नावजलेल्या संस्थांनी याला प्रोत्साहन देते, ही देशासाठी गर्वाची गोष्ट आहे. सर्व प्रकारच्या खेळाला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करण्यासाठी केंद्र सरकारची आवश्यक ती मदत मिळून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
डॉ. मंगेश कराड म्हणाले की, देश आणि राज्यभरातील विद्यार्थ्यांना खेळात करिअर करता येते या एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूटस्चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेतून 2017 पासून विश्वनाथ स्पोर्ट मीट स्पर्धा घेण्यास आम्ही सुरुवात केली. खेळा हा शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. गेल्या 35 वर्षापासून एमआयटी ही शैक्षणिक संस्था खेळाला प्रोत्साहन देते आहे. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अनेक यशस्वी खेळाडूंनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कॅम्पसमध्ये आले आहेत. राज्यस्तरावरील सर्वच खेळाडूंना विश्वनाथ स्पोर्टस् मीट हे हक्काचे व्यासपीठ आगामी काळात होईल. एमआयटी एडीटी विद्यापीठाला ऑलम्पियन स्तरावरील खेळाडू तयार करायचे आहेत. आम्ही खेळाची संस्कृती या समाजात रुजविण्याचे काम करत आहोत. भविष्यात खेळाडूंचा हेवा समाजाला वाटावा या पद्धतीचे खेळाडू निर्माण करण्याचे काम आम्हाला करायचे आहे.
खेळाडूंना त्यांच्या परिवारातून प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाल्यासा अनेक जागतिक स्तरावरील खेळाडू तयार होण्यास वेळ लागणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दुसरे राज्यस्तरीय महाविद्यालयीन विश्वनाथ स्पोर्टस् मीट चार दिवस रंगणार आहे. यात ११ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट (पुरुष), फुटबॉल (पुरुष व महिला), व्हॉलिबॉल (पुरुष व महिला), बॅडमिंटन (पुरुष व महिला), टेबल टेनिस (पुरुष व महिला), टेनिस (पुरुष व महिला) वॉटर पोलो (पुरुष), स्विमिंग (पुरुष व महिला), रोईंग (पुरुष व महिला), बॉक्सिंग (पुरुष व महिला) यांचा यात समावेश आहे. या क्रीडा महोत्सवात राज्याभरातील १०० शैक्षणिक संस्थांचे ३००० विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत विजेत्या, उपविजेत्या आणि प्रत्येक खेळ प्रकाराताली उत्कृष्ट खेळाडूंना ८ लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. राहूल कराड म्हणाले की, एमआयटी ही शैक्षणिक संस्था जगाला शांतीचा संदेश देणारी संस्था आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाला महत्व याठिकाणी दिले जाते. ऑलम्पियन स्तरावरील सर्व आवश्यक सुविधा या संस्थेतील खेळाडूंना दिल्या जातातत. त्यामुळे भविष्यात जागतिस्तरावरील खेळाडूं निर्माण होण्यासाठी हे एक हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. खेळाडूंनी याचा फायदा घेऊन या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नरसिंग यादव म्हणाले की, खेळाला प्रोत्साहन देणाऱ्या विद्यापीठात एकमेव विद्यापीठ म्हणून एमआयटीचे नाव घ्यावे लागते. देशभरातील सर्व विद्यापीठांनी खेळाला प्रोत्साहन आणि आवश्यक सोईसुविधा दिल्यास जागतिक स्तरावरील खेळाडू तयार होण्यात मदत होईल. तसेच जागतिक स्तरावरील पदक जिंकतील. खेळात करिअर खूप मोठे आहे. खेळाडून आपल्या खेळावर लक्ष्य केंद्रित करून मेहनत घेतल्यास यश हामखास मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान जागतिक शरीरसोष्ठव्य स्पर्धा विजेते महेंद्र चव्हण म्हणाले की, खेळाला प्रोत्साहन देणार एकमेव विद्यापीठ म्हणून एमआयटीचे नाव घ्यावे लागते. भविष्य़ाच या विद्यापीठातून जागतिक स्तरावरील मोठे खेळाडू निर्माण होतील.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. सुबोध देवगावकर सूत्रसंचालन स्वप्निल सिरसाठ आणि पायल शाह यांनी केले. तर आभार क्रीडा संचालक पद्माकर फड यांनी व्यक्त केले.