टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 मध्ये बुधवारी (26 ऑक्टोबर) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सुपर 12चा विसावा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सामना खेळला गेला. हा सामना आयर्लंडला या स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी जिंकणे आवश्यक होता. त्यांनी इंग्लंडला डकवर्थ लुईसच्या नियमानुसार या सामन्यात 5 धावांनी पराभूत केले. त्यामुळे हा ऐतिहासिक विजय त्यांच्यासाठी खासच राहिला. त्याचबरोबर त्यांनी मोठ्या विक्रमाचीही नोंद आपल्या नावावर केली.
आयर्लंड क्रिकेट संघ (Ireland Cricket Team) प्रथमच मेलबर्न क्रिकेट ग्रांउडवर (एमसीजी) आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. त्यामध्ये त्यांनी विजय मिळवल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. एमसीजीचा इतिहास पाहिला तर केवळ दोनच विदेशी संघांनी येथे पहिला सामना खेळताना विजय मिळवला आहे. त्यामध्ये आता आयर्लंडचा समावेश झाला असून दुसरा संघ कोणता हे आपण जाणून घेऊ.
एमसीजीवर पहिल्याच सामन्यात विजय मिळवणारा आयर्लंड हा दुसरा पाहूणा संघ ठरला आहे. याआधी श्रीलंकेने अशी कामगिरी केली आहे. त्यांनी 1985 मध्ये एमसीजीवर ऑस्ट्रेलियाचा वनडे सामन्यात 4 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर आता 37 वर्षानंतर आयर्लंडला अशी कामगिरी करता आली आहे.
एमसीजीचे स्टेडियम पाहिले की तेथे सामना जिंकणे तसे सोपे नाही कारण ते क्रिकेटविश्वातील मोठ्या स्टेडियमपैकी एक आहे. त्यावर चेंडू सीमारेषेपार पाठवण्यासाठी फलंदाजांची पार दमछाक होते. अशा स्टेडियवर आयर्लंडने पहिलाच सामना खेळताना इंग्लंडला हरवत इतिहास रचला आहे.
टी20 विश्वचषकातील इंग्लंड विरूद्ध आयर्लंड यांच्यात झालेल्या सामन्याने सर्वांनाच चक्रावून सोडले आहे. कमकुवतं समजल्या जाणाऱ्या आयर्लंड संघाने मजबूत असलेल्या इंग्लंडचा पराभव करत मोठा उलटफेर केला आहे. एमसीजी मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत आयर्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नी (Andrew balbirnie) याच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर 19.2 षटकात सर्वबाद 157 धावा केल्या. बालबर्नीने 47 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. लोर्कन टकर(Lorcan Tucker) याने देखील त्याला चांगली साथ दिली. टकरने 27 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 32 धावा केल्या.
लक्ष्याच्या पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरूवात निराशाजनक झाली. सलामीवीर कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) शून्यावर बाद झाला.14.3 षटकांनंतर इंग्लंडने 5 गडी गमावतं 105 धावा केल्या. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला. नंतर डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंड संघ 5 धावांनी विजयी झाला.
एमसीजीवर त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळताना विजय मिळवणारे संघ-
1985 मध्ये श्रीलंका
2022 मध्ये आयर्लंड
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अहो आश्चर्यम! टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने ‘या’ संघांविरुद्ध जिंकला नाही एकही सामना
विश्वचषकात पावसाचा खेळ सुरूच! न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना एकही चेंडू न टाकता रद्द






