भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चालू असलेल्या कसोटी मालिकेत चाहते स्टीव स्मिथ आणि विराट कोहली यांच्यातील तुल्यबळ द्वंदाची अपेक्षा करत होते. मालिकेच्या अखेरीस या दोघांमधील कोणता फलंदाज जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असेल , यावर तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने अव्वल स्थान काबीज केले आहे.
विलियम्सनच्या सातत्यपूर्ण कामगिरीची भुरळ दिग्गजांनाही पडली आहे. यात भारताचा माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचाही समावेश आहे. लक्ष्मणने न्यूझीलंडच्या कर्णधाराचे कौतुक करताना तो युवा खेळाडूंसाठी एक आदर्श असल्याचे म्हंटले आहे.
“विलियम्सनच्या सातत्याचे आश्चर्य वाटले नाही”
केन विलियम्सनने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकाविले. कसोटी सामन्यातील त्याचे हे सलग तिसरे शतक ठरले. याबाबत बोलताना लक्ष्मणने ट्विटरवर लिहिले, “विलियम्सनच्या सातत्याचे मला जराही आश्चर्य वाटत नाही. कठोर मेहनत आणि सामन्याआधी प्रत्येक लहानसहान गोष्टींवर लक्ष, हे त्याच्या यशाचे गमक आहे. युवा खेळाडूंनी अनुकरण करण्यासाठी तो एक सुयोग्य आदर्श आहे.”
https://twitter.com/VVSLaxman281/status/1346022965129793537
दुसऱ्या दिवसाखरे न्यूझीलंडचे वर्चस्व –
ख्राईस्टचर्च येथील हेगले ओव्हल मैदानावर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानचा पहिला डाव २९७ धावांवर संपुष्टात आला होता. त्याच्या प्रत्युतरात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडची टॉम लॅथम(३३) आणि टॉम ब्लंडेल(१६) ही सलामी जोडी लवकर बाद झाली. तसेच रॉस टेलरही(१२) स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यानंतर विलियम्सनने हेन्री निकोल्सला साथीला घेत न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या दिवसाखेर नाबाद २१५ धावांची भागीदारी रचली आहे. विलियम्सन ११२ धावांवर तर निकोल्स ८९ धावांवर खेळत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
भारतीय संघावर टीका करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मंत्र्याला वसीम जाफर यांचे सडेतोड उत्तर, केले असे ट्विट






