सनरायझर्स हैद्राबाद संघासाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात निराशाजनक झाली आहे. पहिल्या तीनही सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. शनिवारी खेळवल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
यानंतर संघाचा प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मणने पराभवाची कारणमीमांसा केली आहे. चेन्नईच्या मैदानावर तीनही सामन्यात हैद्राबादचा संघ का हरला, याच्या नेमक्या कारणावर त्याने बोट ठेवले आहे.
फलंदाज ठरत आहेत अपयशी
हैद्राबादचे फलंदाज यंदाच्या हंगामात सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहेत. मुंबई विरुद्धच्या सामन्यात देखील हैद्राबादला केवळ १५१ धावांचे लक्ष्य होते. त्यात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरिस्टो यांनी दमदार सलामी देखील दिली होती. मात्र त्यानंतर हैद्राबादने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. आणि पर्यायाने सामना देखील गमावला.
याबाबत सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना लक्ष्मण म्हणाला, “एकेरी दुहेरी धावा काढण्याची कला अतिशय महत्वाची असते. विशेषतः चेन्नई सारख्या खेळपट्ट्यांवर. कारण अशा खेळपट्ट्यांवर मोठे फटके मारणे सोपे नसते. अशावेळी तुम्हाला फक्त चौकार किंवा षटकारांवर अवलंबून राहून चालत नाही. तर स्ट्राईक रोटेट करता येणे देखील गरजेचे असते.”
मुंबई विरुद्धच्या सामन्यात नेमकी हीच गोष्ट करण्यात हैद्राबादच्या फलंदाजांना अपयश आल्याचे लक्ष्मणने सांगितले. तो म्हणाला, “निर्धाव चेंडू फार खेळून काढणे टी२० प्रकारात धोक्याचे असते. पण स्ट्राईक रोटेट न करता आल्यास निर्धाव चेंडूंची संख्या वाढत जाते. मुंबई विरुद्धच्या सामन्यात तेच झाले. विशेषतः राहुल चाहर गोलंदाजी करत असतांना आणि मधल्या ओव्हर्स मध्ये इतर वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत असतांना हे घडले. त्यामुळेच आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला.”
लक्ष्मणने यावेळी फलंदाजांनी मोठी खेळी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. नवीन खेळाडूंना क्रीजवर येताच मोठे फटके मारणे कठीण आहे, त्यामुळे सेट झालेल्या फलंदाजांनी टिकून राहणे गरजेचे आहे, असेही तो यावेळी म्हणाला. आता लक्ष्मणने सांगितलेल्या सुधारणा करून यंदाच्या आयपीएल मधला पहिला विजय मिळविण्यासाठी हैद्राबादचा संघ कसून प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या –
“ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर मी…”, पृथ्वी शॉचा मोठा खुलासा
मोठी बातमी! हिथ स्ट्रिकनंतर आता श्रीलंकेच्या या क्रिकेटरवरही आयसीसीने घातली तब्बल ८ वर्षांची बंदी