या वर्षीच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान भारतात विश्वचषक 2023 स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. हेच लक्षात घेऊन आगामी आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्याच्या सहाय्यक प्रशिक्षकांना विश्रांती दिली जाऊ शकते. द्रविड सध्या भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यानंतर उभय संघात 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. यानंतर द्रविड अँड कंपनीला छोटा ब्रेक दिला जाऊ शकतो.
राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्या जागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (National Cricket Academy) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक (VVS Laxman Coach) पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. द्रविड एनसीएमधील प्रशिक्षकांसोबत आयर्लंड दौरा करू शकतो. लक्ष्मणसोबत फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक, ऋषिकेश कानिटकर तसेच, गोलंदाजी प्रशिक्षक ट्राय कूली आणि साईराज बहुतुले हेदेखील हे आयर्लंड दौऱ्यावर जाणार असल्याचे बोलले जात आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याने यापूर्वीही भारतीय संघासोबत परदेशवारी केली आहे. मागील वर्षी 2022च्या जून महिन्यामध्ये लक्ष्मण प्रशिक्षक म्हणून आयर्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी आयर्लंड विरुद्ध भारत (Ireland vs India) 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. यावेळी भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध 3 टी20 सामन्यांची मालिका खेळेल. मालिकेतील पहिला टी20 सामना 18 ऑगस्ट, दुसरा सामना 20 ऑगस्ट आणि तिसरा सामना 23 ऑगस्ट रोजी खेळला जाईल.
माध्यमांतील वृत्तांनुसार, राहुल द्रविड याच्यासोबत फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतात परततील. भारतयी संघ टी20 मालिकेतील अखेरचे सामने अमेरिकेत खेळणार आहे. द्रविड अँड कंपनीला विश्रांती यासाठी दिली जाणार आहे, कारण ते ताजेतवाणे होऊन आशिया चषकासाठी परततील. आशिया चषकाचे आयोजन 31 ऑगस्टपासून होणार आहे.
विशेष म्हणजे, आशिया चषकानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर भारत विश्वचषक 2023चे यजमानपद भूषवेल. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी अद्याप भारतीय संघाची निवड झाली नाहीये. मात्र, असे म्हटले जात आहे की, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आयर्लंडमध्ये संघाचे नेतृत्व करेल. मागील वेळी भारतीय संघाने पंड्याच्या नेतृत्वाखाली आयर्लंड दौरा केला होता. (vvs laxman to coach hardik pandya to captain in ireland after west indies tour)
महत्वाच्या बातम्या-
विंडीज दौऱ्यानंतर द्रविड अँड कंपनीला मिळणार ब्रेक, प्रशिक्षकपदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर?
‘मी पुढील 10-12 वर्षे कार्लोसचं…’, 20व्या वर्षी विम्बल्डनचा किताब जिंकणाऱ्या अल्कारेझचा फॅन बनला सचिन