माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण हे बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. ते या पदाची जबाबदारी आणखी एक वर्ष सांभाळू शकतात. लक्ष्मण यांचा प्रारंभिक तीन वर्षांचा करार नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू झाला होता, जो या वर्षी सप्टेंबरमध्ये संपणार आहे.
49 वर्षीय लक्ष्मण एनसीएचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील का, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. कारण त्यांना आयपीएल फ्रँचायझीकडून मुख्य प्रशिक्षक बनण्याची ऑफर आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, लक्ष्मण एनसीए अध्यक्षपदी कायम राहिणार असल्याने आयपीएल फ्रँचायझीचे प्रशिक्षक सांभाळण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मणचा प्रशिक्षक संघ
व्हीव्हीएस लक्ष्मण यांना एनसीएमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून शितांशु कोटक, साईराज बहुतुले आणि हृषिकेश कानिटकर यांचा पाठिंबा मिळू शकतो. बहुतुले आणि कानिटकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सेवा केली आहे, तर कोटक हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे नाव आहे.
लक्ष्मण यांची राहुल द्रविडच्या जागी एनसीए प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2021 पासून आत्तापर्यंत लक्ष्मण यांनी भारतीय क्रिकेटमधील सर्व स्तरांवर दुखापती व्यवस्थापन, खेळाडूंचे पुनर्वसन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या प्रक्रियेवर देखरेख केली आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षकही होते
व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अलीकडेच झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका निभावली होती. त्यांनी यापूर्वी आयर्लंड दौरा आणि श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. राहुल द्रविड ब्रेकवर असताना लक्ष्मण यांनी टीम इंडियाला मार्गदर्शन केले आहे.
लक्ष्मण यांची कारकीर्द
व्हीव्हीएस लक्ष्मण यांना भारतीय क्रिकेटमध्ये परिचयाची गरज नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लक्ष्मण हे त्यांच्या काळातील सर्वोत्तम मधल्या फळीतील फलंदाजांपैकी एक होते. त्यांनी 134 कसोटी सामन्यात 17 शतकांच्या मदतीने 8781 धावा केल्या. त्यांची सरासरी 46च्या आसपास होती. याशिवाय त्यांनी 86 वनडेमध्ये सहा शतकांच्या मदतीने 2338 धावा केल्या आहेत.
हेही वाचा-
श्रीजेशने जर्सी तर मनूने दिली पिस्तूल, पंतप्रधान मोदींनी ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंची घेतली भेट
आयपीएलमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटणार? बीसीसीआय सचिव जय शहांची मोठी प्रतिक्रिया
काय सांगता.! आयपीएल संघाच्या प्रशिक्षकांची चक्क इतक्या रुपयांची कमाई, पाहा सर्वात महागडा कोण?