---Advertisement---

आत्तापर्यंत केवळ ३ भारतीय जोड्यांनाच जमलेला ‘तो’ विक्रम आता शार्दुल-सुंदरच्याही नावावर

---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्टात आला आहे. एकवेळ १८६ धावांवर ६ विकेट अशी अवस्था असणाऱ्या भारतीय संघाला या डावात शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जोडीने पुनरागमन करुन दिले. या दोघांनी शतकी भागीदारी रचली. त्याचबरोबर एक खास विक्रमही केला आहे.

शार्दुल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदरची शतकी भागीदारी – 

भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या विकेट्स नियमित अंतराने गमावल्या. त्यामुळे भारताचा डाव लवकर आटपणार असे वाटत असतानाच ७ व्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर आणि ८ व्या क्रमांकावर शार्दुल ठाकूरने फलंदाजी करताना शानदार अर्धशतके झळकावली. शार्दुलने ११५ चेंडूत ६७ धावा केल्या. या खेळीत त्याने ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. तसेच सुंदरने १४४ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला.

याबरोबरच त्यांनी ७ व्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत ७ व्या विकेटसाठी शतकी भागीदारी करणारी त्यांची चौथीच जोडी ठरली. याआधी असा कारनामा रिषभ पंत-रविंद्र जडेजा, विजय हजारे – हेमू अधिकारी आणि मोहम्मद अझरुद्दीन – मनोज प्रभाकर या तीन जोड्यांना जमला होता.

ऑस्ट्रेलियात ७ व्या विकेटसाठी सर्वोच्च धावांची भागीदारी करणाऱ्या जोड्या –

विशेष म्हणजे कसोटीत ऑस्ट्रेलियामध्ये ७ व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करणाऱ्या जोड्यांच्या यादीत शार्दुल आणि सुंदर यांची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. त्यांनी अझरुद्दीन आणि प्रभाकर यांच्या जोडीला मागे टाकले आहे. अझरुद्दीन आणि प्रभाकर यांनी साल १९९२ ला ऍडलेड येथे १०१ धावांची भागीदारी केली होती.

तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर पंत आणि जडेजाची जोडी आहे. त्यांना २०१९ साली सिडनी येथे २०४ धावांची भागीदारी ७व्या विकेटसाठी केली होती. खास गोष्ट म्हणजे ७ व्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियात द्विशतकी भागीदारी करणारी पंत आणि जडेजा यांची एकमेव जोडी आहे. त्यांच्याव्यतिरिक्त जगतिक क्रिकेटमधीलही कोणत्याही जोडीला ७ व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियात द्विशतकी भागीदारी करता आलेली नाही.

ब्रिस्बेन कसोटीत दोन्ही संघांचे पारडे समान –

सध्या सुरु असलेल्या ब्रिस्बेन कसोटीत शार्दुल आणि सुंदरच्या खेळींमुळे भारताला ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या बरच जवळ जाता आले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या सामन्यात नाममात्र ३३ धावांची आघाडी मिळाली. या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाची सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ६ षटकात बिनबाद २१ धावा केल्या आहे. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेविड वॉर्नर(२०*) आणि मार्कस हॅरिस(१*) नाबाद खेळत आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत ७ व्या विकेटसाठी सर्वोच्च धावांची भागीदारी करणाऱ्या भारतीय जोड्या – 
२०४ धावा – रिषभ पंत – रविंद्र जडेजा, सिडनी, २०१९
१३२ धावा – विजय हजारे – हेमू अधिकारी, ऍडलेड, १९४८
१२३ धावा – शार्दुल ठाकूर – वॉशिंग्टन सुंदर, ब्रिस्बेन, २०२१
१०१ धावा – मोहम्मद अझरुद्दीन – मनोज प्रभाकर, १९९२

महत्त्वाच्या बातम्या – 

“तंत्र-मंत्र केल्याने विकेट्स मिळत नाहीत”, ब्रिस्बेन कसोटीतील लायनच्या ‘त्या’ कृतीवर चाहत्यांची प्रतिक्रिया

सिराजकडे ‘त्या’ प्रकारचा चेंडू टाकण्याची नैसर्गिक शैली आहे, सचिन तेंडुलकरने केली पाठराखण

किंग्स इलेव्हन पंजाबचा ‘हा’ क्रिकेटर बनला बाबा, झाली पुत्ररत्न प्राप्ती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---