टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तानने पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने पहिल्यांदाच भारतीय संघाचा पराभव केला आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर माजी क्रिकेटपटू वकार युनूसने वादग्रस्त विधान केले होते. मात्र, वकार युनूसने आता भारतीयांची माफी मागितली आहे. भारताच्या पराभवाचा संदर्भ देत त्याने एका टीव्ही कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते.
टी२० विश्वचषक २०२१ सुपर १२ सामन्यात, रिजवानने ५५ चेंडूत ७९ धावांची शानदार खेळी खेळली आणि बाबर आझमसोबत नाबाद १५२ धावांची भागीदारी केली होती. दोघेही नाबाद राहिले आणि त्यांच्या संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला. दरम्यान, रिजवानने अर्धशतकानंतर मैदानावर नमाज अदा केला होता.
यानंतर, पाकिस्तानच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या युनूसने म्हटले होते, रिझवानला मैदानावर हिंदूंसमोर नमाज अदा करताना पाहून मला आनंद झाला. वकार म्हणाला होता की, ‘बाबर आणि रिजवान ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, स्ट्राईक रोटेशन, त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास अप्रतिम होता. सगळ्यात चांगले म्हणजे रिजवानने जे केले, त्याने हिंदूंनी वेढलेल्या भूमीवर नमाज अदा केली, ते माझ्यासाठी खरोखरच खास होते.’
या विधानानंतर युनूस यांच्यावर जोरदार टीका झाली. मात्र, त्यांनी आता माफी मागितली असून, लोकांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नसल्याचे म्हटले आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, ‘भावनेच्या भरात मी असे काही बोललो, माझा उद्देश लोकांच्या भावना दुखावण्याचा नव्हता. त्याबद्दल मी माफी मागतो, तो मुळीच हेतू नव्हता. माझी चूक झाली. जात, रंग किंवा धर्माचा विचार न करता खेळ लोकांना एकत्र आणतो. मी दिलगीरी व्यक्त करत आहे.’
In the heat of the moment, I said something which I did not mean which has hurt the sentiments of many. I apologise for this, this was not intended at all, genuine mistake. Sports unites people regardless of race, colour or religion. #apologies 🙏🏻
— Waqar Younis (@waqyounis99) October 26, 2021
प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनीही युनिसला त्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून फटकारले होते. ते म्हणाले, ‘वकार युनूस सारख्या महान खेळाडूने असे वक्तव्य करणे खूप निराशाजनक होते, हे मी ऐकलेल्या सर्वात निराशाजनक गोष्टींपैकी एक आहे. आपल्यापैकी बरेच जण खेळाबाबत बोलतात, पण हे खूप भयंकर आहे.’
पाकिस्तानचा सलामीवीर रिझवान २०२१ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे. भारताविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर रिझवान न्यूझीलंडविरुद्धही चांगला खेळला. २९ वर्षीय रिझवानने ३४ चेंडूत ३३ धावा केल्या. पाकिस्तानने हा सामना पाच विकेटने जिंकला. त्यामुळे पाकिस्तानची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता आता वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
युएईत आयपीएल खेळल्याने टी२० विश्वचषकात होतोय फायदा, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने गायले गोडवे
आनंदाची बातमी! मिताली राजला खेलरत्न पुरस्कार, तर शिखरलाही मिळणार मोठा पुरस्कार
माजी ऑसी यष्टीरक्षकाने सांगितली टी२० विश्वचषकातील भारतीय संघाची सर्वात मोठी कमजोरी