शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिले २ सामने चेन्नई येथे होणार आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंधेला गुरुवारी(४ फेब्रुवारी) विराट कोहली अभासी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने पहिल्यांदाच पालक बनण्याबद्दल आणि पालकत्व रजा घेतल्यानंतरही भारतीय संघाशी जोडलेला असल्याचे सांगितले आहे.
भारतीय क्रिकेट संघाने नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर विराट पालकत्व रजा घेऊन भारतात परतला होता. त्यावेळी पहिल्या सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच विराटही भारतात परतल्याने भारताची वाटचाल कठीण समजली जात होती. पण असे असतानाही भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
दरम्यान, ही कसोटी मालिका सुरु असताना सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ११ जानेवारीला विराट कोहलीला कन्यारत्न प्राप्त झाले. या सर्व गोष्टींबद्दलच्या भावना विराटने गुरुवारी व्यक्त केल्या.
विराट म्हणाला, ‘दोन गोष्टींची तुलना होऊ शकत नाही. बाबा बनणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता आणि राहिल. मी जे म्हणत आहे, ती गोष्ट समजण्यासाठी, त्याचा अनुभव घ्यावा लागेल. असे असले तरी संघाबरोबरील संबंध कोणत्याही परिस्थीत संपत नाहीत, विशेषत: जेव्हा तुम्ही संघासाठी सर्वकाही देत असता, खास करुन मागील सहा वर्षापासून ज्या संघासाठी तुम्ही सर्वकाही दिले आहे. कसोटी क्रिकेटला तसेच भारतीय क्रिकेटला अव्वल क्रमांकावर नेण्याची प्रेरणा आहे आणि सर्व संघ खूप प्रयत्न करत आहे.’
याबरोबरच विराटने मान्य केले की त्याची पालकत्व रजा सुरु असताना तो भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेली कसोटी मालिका पाहात असायचा. तो म्हणाला, ‘तुम्ही नेहमीच संघाशी जोडलेले असता आणि मी सर्व सामने पाहिले आहेत. शेवटच्या कसोटीवेळी जेव्हा शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर भागीदारी करत होते, तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला आत बोलावण्याआधी मी माझ्या फोनवर सामना पाहात होतो.”
विराट मुलीच्या जन्मानंतर पहिली कसोटी मालिका –
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ही विराटसाठी त्याच्या मुलीच्या जन्मानंतरची पहिली कसोटी मालिका आहे. त्याने आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने त्यांच्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून इंग्लंडपेक्षा भारतावरच असेल जास्त दबाव, कसोटी मालिकेआधी जो रुटची मोठी प्रतिक्रिया
“ऑस्ट्रेलियामधील विजय हा विशेष होता, पण आता ती घटना घडून गेली आहे”
INDvENG : पहिल्या सामन्यासाठी ठरले भारतीय सलामीवीर, तर यष्टिरक्षक म्हणून मिळाली ‘या’ खेळाडूला संधी