भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आजच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील एक सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याला बाद करणे, हे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. मात्र कोहली सहजासहजी आपली विकेट प्रतिस्पर्धी गोलंदाजाला मिळू देत नाही. आणि कोहली केवळ सामन्यादरम्यानच नव्हे तर नेट्समध्ये सराव करतांना देखील गोलंदाजांना आपली विकेट घेण्यासाठी मेहनत करायला भाग पाडतो. याबाबत भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरनेच केला आहे.
“नेट्समध्ये देखील फोडतो गोलंदाजांना घाम”
अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर भारतीय संघाकडून खेळतांना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तर खेळतोच. याशिवाय आयपीएल मध्ये देखील तो कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाकडूनच खेळतो. त्यामुळे साहजिकच सुंदरने अनेकदा कोहलीला नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे. याच दरम्यान कोहलीच्या फलंदाजीबाबत केलेली निरीक्षणे सुंदरने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या एका मुलाखतीत मांडली.
या मुलाखतीत वॉशिंग्टन सुंदरला नेट्समध्ये कोहलीची विकेट किती वेळा मिळते, असा प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर देतांना सुंदर म्हणाला, “विराट कोहली नेट्समध्ये सराव करतांना अतिशय गंभीर असतो. नेट्समध्ये फलंदाजी करतांना देखील त्याची एकाग्रता अतिशय मजबूत असते. त्यामुळे सामन्यातच नाही तर नेट्समध्ये देखील त्याची विकेट घेणे, अजिबात सोपे नसते. त्यासाठी तो गोलंदाजांना चांगलाच घाम फोडतो.”
बाबर आझमने देखील केले होते कौतुक
वॉशिंग्टन सुंदरने एकप्रकारे विराट कोहलीच्या यशामागील रहस्याचा खुलासा केला आहे. कोहलीच्या याच मेहनतीमुळे आजच्या घडीला विश्वातील तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो अव्वल फलंदाज मानला जातो. पाकिस्तानचा अव्वल फलंदाज बाबर आझमने देखील भारतीय कर्णधाराच्या या पैलूची काही दिवसांपूर्वी प्रशंसा केली होती. बाबरने हे कबूल केले होते की प्रारंभीच्या काळात तो स्वतःदेखील नेट्समध्ये सराव करतांना अजिबात गंभीर नसे. मात्र विराट कोहलीशी बातचीत झाल्यानंतर नेट्समधल्या सरावाचे महत्व त्याला समजले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबा नंबर १! वीकेंडला वॉर्नर असा करतो लाडक्या लेकींबरोबर मजा; पाहा बाप-लेकींचे गोड व्हिडिओ
एवढा कॉन्फिडन्स! इंग्लिश दिग्गजाची भविष्यवाणी, भारत-इंग्लंडमध्ये ‘हा’ संघ ५-०ने जिंकेल कसोटी मालिका