इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे प्रदर्शन घडवले. मात्र भारताचा एक खेळाडू या सामन्यात काहीसा दुर्दैवी ठरला. हा खेळाडू म्हणजे वॉशिंग्टन सुंदर.
भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर खेळत होता. मात्र तो नॉन स्ट्राईकला असतांना दुसऱ्या बाजूने भारताच्या डावाच्या उर्वरित विकेट पडल्या आणि त्यामुळे त्याला ९६ धावांवर नाबाद राहून परतावे लागले आणि कसोटी क्रिकेटमधील पहिल्या शतकाची त्याची प्रतिक्षा अजूनच लांबली. मात्र आता यावर त्याच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“खालच्या फळीतील फलंदाजांनी अजून धैर्य दाखवायला हवे होते”
वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर खेळत असतांना अक्षर पटेल त्याला उत्तम साथ देत होता. मात्र ११४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेल धावबाद झाला. त्यांनतर पुढचे षटक टाकण्यासाठी बेन स्टोक्स आला. आणि त्याने पहिल्या चेंडूवर इशांत शर्मा तर चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजला बाद करत भारताच्या डावाला पूर्णविराम दिला. मात्र यामुळे नॉन स्ट्राईकला असलेल्या वॉशिंग्टन सुंदरला शतकाविना परतावे लागले.
यावर वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनी आता चांगलीच नाराजी प्रकट केली आहे. ते म्हणाले, “खालच्या फळीतील फलंदाजांच्या प्रदर्शनाने मी खूप निराश आहे. थोडावेळ देखील ते क्रीजवर टिकू शकले नाहीत. जर समजा भारतीय संघाला जिंकण्यासाठी १० धावांची गरज असती, तर त्या परिस्थितीत ही नक्कीच मोठी चूक मानल्या गेली असती. अनेक युवा खेळाडू सामने पाहत असतात आणि त्यांच्यासाठी हा अतिशय वाईट संदेश आहे. इथे तंत्रापेक्षा थोडे धैर्य दाखवण्याची आवश्यकता होती. आणि मुख्य म्हणजे इंग्लंडचे गोलंदाज थकले होते. बेन स्टोक्स तर अवघ्या १२५च्या गतीने गोलंदाजी करत होता. अशा परिस्थितीत विकेट गमावल्याने मी नक्कीच निराश आहे.”
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरचे वैयक्तिक शतक हुकले असले तरी भारतीय संघासाठी मात्र सामना लाभदायी ठरला. भारताने संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवताना सहज विजय मिळवला. या विजयाने भारताने मालिका तर खिशात टाकलीच, त्याशिवाय जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी देखील झेप घेतली. इतकेच नव्हे तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही स्थान मिळवले. आता १८ जूनपासून खेळवल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करेल.
महत्वाच्या बातम्या:
INDvsENG: त्याने माझ्यात आत्मविश्वास भरला, म्हणून मी शतक झळकावले; आर अश्विनचे वक्तव्य
वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपची फायनल होणार साउदम्प्टनच्या मैदानावर? या कारणामुळे लॉर्डस गमावणार यजमानपद
आयपीएल पुन्हा एकदा विनाप्रेक्षक, पाहा बीसीसीआयने काय घेतला निर्णय?






