---Advertisement---

ब्रिस्बेन कसोटीतील वॉशिंग्टनच्या ‘सुंदर’ खेळीनंतरही वडील निराश, काय आहे यामागचं कारण

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 10:40 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनच्या मैदानावर चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीचा तिसरा दिवस युवा भारतीय खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांच्या नावे झाला. ऑस्ट्रेलिया संघाच्या पहिल्या डावातील ३६९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची वरची आणि मधली फळी ढेपाळली. परंतु खालच्या फळीत फलंदाजीला आलेल्या सुंदर आणि शार्दुल यांनी मैदानावर तळ ठोकून ऐतिहासिक भागिदारी रचली. यामुळे भारत ३३६ धावांचा आकडा गाठू शकला.

गोलंदाजीनंतर फलंदाजीतही अप्रतिम कामगिरी करणाऱ्या सुंदर आणि शार्दुलने क्रिकेट रसिकांच्या मनात घर केले. परंतु सुंदरचे वडील एम सुंदर हे त्याच्या फलंदाजीवर नाखुश असल्याचे दिसून आले. यामागचे कारण म्हणजे, त्यांना सुंदरकडून अर्धशतकी नव्हे तर शतकी खेळीची अपेक्षा होती. सोबतच आपल्या मुलामध्ये वरच्या फळीत फलंदाजी करण्याची क्षमता आहे. परंतु त्याला ब्रिस्बेन कसोटीत केवळ खालच्या-मधल्या फळीत फलंदाजीसाठी निवडल्याची खंत त्यांना आहे.

वॉशिंग्टन सुंदरच्या वडीलांचे वक्तव्य

याविषयी आयएएनएसशी बोलताना एम सुंदर म्हणाले की, “सुंदरने ब्रिस्बेन कसोटीत अतिशय विशेष फलंदाजी केली. परंतु तो त्याची तीच खास खेळी शतकात रुपांतरित न करु शकल्याने मी हताश झालो आहे. कमीतकमी शार्दुल आणि नवदीप सैनी बाद झाल्यानंतर मोहम्मद सिराजसोबत मिळून त्याने जोरदार फटकेबाजी करायला हवी होती. परंतु त्याने पळून एक-दोन धावा घेण्याला प्राधान्य दिले.”

“मला माहिती आहे की, सुंदर पुल शॉट्स आणि जोरदार फटके मारु शकतो. त्याच्या क्षमतेनुसार त्याने मोठी खेळी साकारण्याचा प्रयत्न करायला हवा होता. परंतु त्याने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. परिणामत: भारतीय संघाला कमी धावांची आघाडी मिळाली असती,” असे ते पुढे बोलताना म्हणाले.

तसेच शेवटी एम सुंदर यांनी सांगितले की, “तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यापासून दररोज मी त्याला बोलत असतो. मी त्याला फार पुर्वीच सांगितले होते की, जेव्हाही तुला संधी मिळेल, तेव्हा तू मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न कर आणि संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचल.”

वॉशिंग्टन सुंदरने सावरला भारताचा डाव  

भारताच्या पहिल्या डावात ६७ षटकात भारतीय संघ ६ बाद १८६ धावांवर होता. आघाडीचे सहा फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा पहिला डाव लवकरच आटोपेल आणि ऑस्ट्रेलियाला १५० धावांच्या जवळपास आघाडी मिळेल असे सर्वांना वाटत होते. अशात सुंदर आणि शार्दुलने अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर फलंदाजीला येत शतकाच्या जवळपास भागिदारी केली.

सुंदरने १४४ चेंडूत ४३.०६च्या स्ट्राईक रेटने ६२ धावा केल्या. या खेळीसाठी त्याने १ षटकार आणि ७ चौकार मारले. अखेर मिचेल स्टार्कने कॅमरॉन ग्रीनच्या हातून त्याला झेलबाद केले. तर शार्दुलने ११५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात ३३६ धावा करु शकला आणि ऑस्ट्रेलियाला नाममात्र ३४ धावांची आघाडी मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : पहिल्या सत्रातच भारतीय गोलंदाजांची कमाल, ऑस्ट्रेलियाच्या ४१ षटकात ४ बाद १४९ धावा

ब्रिस्बेन कसोटी गाजवणारा शार्दुल ठाकूरने केला गेमप्लॅनचा खुलासा; म्हणाला, ‘आमची योजना होती की…”

शार्दुल ठाकूर म्हणाला, फलंदाजी करताना रवि शास्त्री यांनी सांगितलेली ‘ही’ गोष्ट होती लक्षात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---