गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) 200 व्या टी20 सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने भारतीय संघाला 4 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. भारतीय संघाकडून दोन युवा खेळाडू तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांनी आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात पदार्पण केले. यापैकी तिलक या सामन्यात चांगली छाप पाडण्यात यशस्वी ठरला. या सामन्यानंतर भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने तिलकचे कौतुक केले.
तिलक याने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात 39 धावांची एक आक्रमक फलंदाजी केली. भारतीय संघाने 28 धावांवर दोन विकेट्स गमावल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर तिलकला फलंदाजीसाठी संधी मिळाली. तिलकने आपल्या आयुष्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर षटकार खेचला. त्याने वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या षटकात एकापाठोपाठ 2 षटकार मारले. तिलकने 177.27 या स्ट्राईक रेटने 22 चेंडूत 39 धावा केल्या. या सामन्यात तिलकने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या.
पहिल्या सामन्यातील या कामगिरीनंतर त्याचे कौतुक करताना जाफर म्हणाला,
“तिलकने मला खूप प्रभावित केले. त्याने जशी सुरुवात केली त्यावरून असे वाटत होते की तो क्लब क्रिकेट अथवा आपल्या राज्यासाठी खेळत आहे. त्याने आपला नैसर्गिक खेळ दाखवला. आणखी वीस धावा न बनवल्यामुळे तो नक्कीच निराश झाला असेल.”
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात त्यांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 150 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 9 विकेट्स गमावत फक्त 145 धावाच करता आल्या. वेस्ट इंडीज संघासाठी महत्त्वपूर्ण तीन बळी घेणारा जेसन होल्डर सामनावीर ठरला.
(Wasim Jaffer Praised Tilak Varma After First T20 Batting)
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांना 3 वर्षांची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण?
विराटने ज्या गोलंदाजाला चोपले, कार्तिकने त्याचेच गायले गोडवे; म्हणाला, ‘तो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट…’