---Advertisement---

INDvENG: खराब कामगिरीमुळे इंग्लिश दिग्गजाने टीम इंडियाची केली थट्टा अन् पडला तोंडघशी

On: शनिवार, मार्च 13, 2021 11:25 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका शुक्रवारपासून (१२ मार्च) सुरू झाली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या या मालिकेतील सलामीच्या सामन्यात पाहुण्यांनी ८ विकेट्सने यजमानांना पराभूत केले. या सामन्यातील खराब कामगिरीमुळे माजी इंग्लंड दिग्गज मायकल वॉन यांना भारतीय संघावर निशाणा साधण्याची संधी मिळाली. परंतु माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी त्यांना जबरदस्त प्रत्युत्तर देत तोंडघशी पाडले.

त्याचे झाले असे की, नाणेफेकीचा निकाल इंग्लंडच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र भारतीय फलंदाजांना खास प्रदर्शन करता आले नाही. परिणामत: २० षटकात ७ विकेट्स गमावत त्यांनी अवघ्या १२४ धावा केल्या. यानंतर वॉननी ट्विटरद्वारे भारतीय संघाची थट्टा केली.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘टी२० क्रिकेट स्वरुपातील आयपीएलचा मुंबई इंडियन्स संघदेखील भारतीय संघापेक्षा जास्त चांगला आहे.’ यावेळी त्यांनी बीसीसीआयला टॅग केले. तसेच हॅशटॅगमध्ये #JustSaying अर्थात असेच सहज सांगत आहे, असे लिहिले.

यावर जाफरनी वॉनला खरीखोटी सुनावली. त्यांनी वॉनच्या ट्विटला प्रत्युत्तर देत लिहिले की, ‘सर्व संघ तुमच्याइतके भाग्यशाली नसतात मायकल, जे ४ परदेशी खेळाडूंना घेऊन खेळतात.’

जाफर यांनी वॉन यांना असे उत्तर देण्यामागचे कारण असे की, भारत नव्हे तर इंग्लंड आयपीएलमधील संघाप्रमाणे ४ परदेशी खेळाडूंना घेऊन मैदानात उतरला होता. इंग्लंडच्या पहिल्या टी२० सामन्यातील अंतिम ११ जणांच्या पथकात ४ असे खेळाडू होते, जे मुळात इंग्लिश वंशाचे खेळाडू नाहीत. इंग्लंडचा कर्णधार ऑएन मॉर्गन (आयर्लंड) जेसन रॉय (दक्षिण आफ्रिका), आदिल रशीद (पाकिस्तान) आणि जोफ्रा आर्चर (वेस्ट इंडिज) हे परदेशी मुळ असलेले क्रिकेटपटू आहेत.

 

भारतीय खेळाडूंची निराशाजनक कामगिरी 
सामन्याचा विचार करायचा झाल्यास, भारतीय खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे साजेशी कामगिरी करता आली नाही. फलंदाजीत फक्त एकट्या श्रेयस अय्यरने धावांनी पन्नाशी पार केली. ४८ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने सर्वाधिक ६७ धावा काढल्या. इतर फलंदाज २५ धावांचा आकडाही पार करू शकले नाहीत. यासह भारताने इंग्लंडला विजयासाठी फक्त १२५ धावांचे लक्ष्य दिले.

भारताच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर जेसन रॉयने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तर जोस बटलर (२८ धावा), डेविड मलान (२४ धावा) आणि जॉनी बेयरस्टो (२६ धावा) यांनीही धावा केल्या. त्यामुळे १५.३ षटकात २ विकेट्स गमावत भारताचे लक्ष्य पूर्ण केले. यावेळी गोलंदाजीतही भारतीय खेळाडूंनी निराशाजनक प्रदर्शन केले. त्यातही अनुभवी गोलंदाज युजवेंद्र चहलने ४ षटकात तब्बल ४४ धावा देत फक्त १ विकेट चटकावली.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! वाचा मोहम्मद सिराजच्या संघर्षमय क्रिकेट प्रवासाची कहाणी

पहिल्याच टी२० सामन्यात राडा, भर मैदानात भिडले सुंदर-बेयरस्टो अन्…; पाहा व्हिडिओ

रोहित शर्माला का दिली नाही पहिल्या टी२० सामन्यात संधी? पाहा काय म्हणाला विराट कोहली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---