नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात शुक्रवारी (१२ मार्च) पहिला टी२० सामना पार पडला. या सामन्याच पाहुण्यांनी यजमानांची पुरती दैना उडवत १६ व्या षटकातच ८ विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १५.३ षटकात २ विकेट्सच्या नुकसानावर भारताचे लक्ष्य पूर्ण केले.
दरम्यान भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदर आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला.
नक्की काय घडले
त्याचे झाले असे की, भारतीय संघाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुंदर डावातील १४ वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान याने ऑन साइडला हवेत शॉट मारला. यावेळी नॉन स्ट्राईकर बाजूला बेयरस्टो उभा होता. मलानने मारलेला चेंडू सरळ आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून सुंदर झेल पकडण्यासाठी धावला. परंतु बेयरस्टो तिथे उभा असल्याने सुंदरची आणि त्याची एकमेकांत टक्कर झाली आणि तो चेंडू जाऊन बेयरस्टोच्या हेल्मेटला धडकला.
या सर्व प्रकारात सुंदरच्या हातून झेल हुकला. यामुळे त्याचा पारा चढला आणि तो बेयरस्टोवर भडकला. आपली चूक नसतानाही सुंदर आपल्यावर ओरडत असल्याचे पाहून बेयरस्टोनेही त्याला प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्यातील शाब्दिक युद्ध पेटत गेले. अखेर पंच नितिन मेनन यांनी मध्यस्थी केली आणि त्यांचा वाद मिटवला. पुढे कर्णधार विराट कोहलीनेही पुढाकार घेत सुंदरला शांत केले.
यावेळचे सर्व दृश्य कॅमेरात कैद झाले. अनेकांनी सुंदर आणि बेयरस्टो यांच्यातील शाब्दिक गरमागरमीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
https://twitter.com/pant_fc/status/1370416926225170433?s=20
भारतीय खेळाडूंची निराशाजनक कामगिरी
सामन्याचा विचार करायचा झाल्यास, भारतीय खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे साजेशी कामगिरी करता आली नाही. फलंदाजीत फक्त एकट्या श्रेयस अय्यरने धावांनी पन्नाशी पार केली. ४८ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने सर्वाधिक ६७ धावा काढल्या. इतर फलंदाज २५ धावांचा आकडाही पार करू शकले नाहीत.
गोलंदाजीतही भारतीय खेळाडूंनी निराशाजनक प्रदर्शन केले. त्यातही अनुभवी गोलंदाज युजवेंद्र चहलने ४ षटकात तब्बल ४४ धावा देत फक्त १ विकेट चटकावली.
महत्त्वाच्या बातम्या-
शिखर, विराट, केएल राहुलच्या विकेट्सने आत्तापर्यंत कधीही आली नव्हती ती वेळ भारतीय संघावर आणली
भारताविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात काळी पट्टी बांधून उतरला होता इंग्लंड संघ, ‘हे’ होते कारण
सुपरमॅन केएल राहुल! हवेत सूर मारत रोखला षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल