---Advertisement---

शिखर, विराट, केएल राहुलच्या विकेट्सने आत्तापर्यंत कधीही आली नव्हती ती वेळ भारतीय संघावर आणली

On: शनिवार, मार्च 13, 2021 1:34 AM
---Advertisement---

अहमदाबाद। शुक्रवारी(१२ मार्च) इंग्लंड संघाने पहिल्या टी२० सामन्यात भारताला ८ विकेट्सने दारुण पराभूत केले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला पहिला टी२० सामना जिंकून इंग्लंडने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील १-० अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात भारताला पराभव तर स्विकारावा लागलाच पण भारतीय संघाच्या नावावर एक नकोसा विक्रमही झाला आहे.

भारताची वरची फळी अपयशी 

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला आमंत्रण दिले. मात्र भारताची सुरुवात फारच वाईट झाली. भारताने दुसऱ्याच षटकात सलामीवीर केएल राहुलची विकेट गमावली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने केएल राहुलला १ धावेवर त्रिफळाचीत केले. पुढच्याच षटकात भारताचा कर्णधार विराट कोहलीला शुन्यावर आदिल राशिदने बाद केले. विराटचा झेल ख्रिस जॉर्डनने घेतला. एवढेच नाही तर सलामीवीर शिखर धवन ४ धावा करुन मार्क वूडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

भारताचे पहिले तीनही फलंदाज वैयक्तिक ५ धावाही न करता तंबुत परतले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या बाबतीत असे पहिल्यांदाच झाले की पहिल्या ३ क्रमांकाचे फलंदाज ५ धावाही करु शकले नाहीत. याआधी भारतीय संघावर अशी नामुष्की कधीही ओढावली नव्हती.

श्रेयस अय्यरने सांभाळला डाव 

पहिले तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने रिषभ पंतसह २८ धावांची आणि हार्दिक पंड्यासह ५४ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सांभाळला. पंतने २१ आणि पंड्याने १९ धावांची छोटेखानी खेळी केली. तर एकाकी झुंज देणाऱ्या अय्यरने ४८ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला.

अय्यरच्या या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या. तसेच इंग्लंडला १२५ धावांचे आव्हान दिले. इंग्लंडकडून १२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी ७२ धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. बटलर २८ धावा करुन बाद झाल्यानंतरही रॉयने डेविड मलानसह डाव पुढे नेला. पण रॉय ४९ धावा करुन बाद झाला.

त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मलानने आणखी विकेट न गमावता इंग्लंडचा डाव पुढे नेला. नंतर १६ व्या षटकात मलानने षटकार ठोकत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मलानने नाबाद २४ धावा केल्या. तर बेअरस्टोने नाबाद २६ धावा केल्या. भारताकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

आता पुढील सामना १४ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात काळी पट्टी बांधून उतरला होता इंग्लंड संघ, ‘हे’ होते कारण

सुपरमॅन केएल राहुल! हवेत सूर मारत रोखला षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल

चहलने शंभरावा सामना बनविला संस्मरणीय; बुमराहला पछाडत ‘या’ यादीत पोहचला पहिल्या क्रमांकावर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---