कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील पहिला क्रिकेट सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १९ षटकातच ३ विकेट्स शिल्लक ठेवून भारताचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामना खिशात घातला. मात्र या सामन्यात भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर हिने आकर्षक खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान तिने विक्रमी षटकारही मारला.
भारताकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ३४ चेंडूत ५२ धावांची प्रशंसनीय खेळी केली. तिच्या या खेळीमुळे भारतीय संघ १५० धावांचा आकडा पार करू शकला. या खेळीदरम्यान तिने १ षटकार आणि ८ चौकारही मारले. अशाप्रकारे या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाकडून षटकार मारणारी ती पहिली आणि एकमेव खेळाडू राहिली. तिच्याव्यतिरिक्त भारताची कोणतीही फलंदाज या सामन्यात षटकार मारू शकली नाही.
हरमनप्रीतने डावातील १८ व्या षटकातील जेस जोनासनच्या शेवटच्या चेंडूवर लॉन्ग ऑनवरून खणखणीत षटकार मारला. तिच्या या नेत्रदीपक षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हरमनप्रीत कॉमनवेल्थ गेम्समध्ये षटकार मारणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटर आणि एकूण दुसरी भारतीय क्रिकेटपटू बनली आहे. तिच्यापूर्वी १९९८ मध्ये अजय जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच कॉमनवेल्थ गेम्समध्ये षटकार ठोकला होता. विशेष म्हणजे, त्यावेळी जडेजाही भारतीय संघाचे नेतृत्त्व करत होता.
🇮🇳An entertaining knock of 52 Runs in just 34 Balls by skipper Harmanpreet Kaur 🔥#CWG2022 #CricketTwitter #B2022 #harmanpreet pic.twitter.com/n9Lez0eqnD
— Ankit Rajput (@ankit_rajput9) July 29, 2022
आणखी एक विक्रम नावावर
दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक करत हरमनप्रीतने आणखी एक विक्रम नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अर्धशतकासह ती कॉमनवेल्थ गेम्समध्ये अर्धशतक करणारी जगातील पहिलीच महिला फलंदाज बनली आहे. तसेच असा बहुमान मिळवणारी पहिलीच भारतीय क्रिकेटरही (महिला आणि पुरुषांमध्ये) बनली आहे.
महिला क्रिकेट संघाने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी पुरुषांचा संघ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झाला आहे. १९९८ मध्ये पहिल्यांदा कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळताना क्रेग इव्हान्सने जमैकाविरुद्ध अर्धशतक झळकावत पहिलावहिला अर्धशतकवीर बनण्याचा मान मिळवला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एमएस धोनीवरही भारी पडली ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, टी२० क्रिकेट इतिहासात केली मोठ्या विक्रमाची नोंद
भारतीय दिग्गजाने साथ सोडल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका, आयपीएल आहे कारणीभूत?
रेणुका सिंगची ऐतिहासिक कामगिरी, बनली झुलन गोस्वामीनंतर ‘हा’ पराक्रम करणारी दुसरी भारतीय