भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी) १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उभय संघ या मालिकेसाठी पूर्ण तयारीत आहेत. मात्र, सामना सुरू होण्यास चार दिवसांचा अवधी शिल्लक असताना, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अव्वल फिरकीपटू नॅथन लायनने रणशिंग फुंकले आहे. सध्याचा ऑस्ट्रेलिया संघ गेल्या वेळेपेक्षा अधिक मजबूत आहे, असे लायनने म्हटले.
सध्याचा संघ गेल्या वेळेपेक्षा अधिक मजबूत
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या २०१८-२०१९ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर २-१ ने विजय मिळवला होता. कोणत्याही आशियाई संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यावेळी, ऑस्ट्रेलिया संघात अनुभवी स्टीव स्मिथ व डेविड वॉर्नर यांचा समावेश नव्हता. त्याविषयी बोलताना लायन म्हणाला,
“मागील मालिकेत काय झाले हे सर्व जण जाणतात. आमची आगामी मालिकेसाठी रणनीती तयार आहे. संघाचे मनोबल वाढल्याने आम्ही चांगली कामगिरी करू. सध्याचा संघ नक्कीच मागील वेळेपेक्षा अधिक मजबूत आहे. वॉर्नरसारख्या खेळाडूचे दुखापतीमुळे बाहेर जाणे निराशाजनक आहे परंतु, हा खेळाचा भाग आहे.”
गोलंदाजांचे केले कौतुक
लायनने आपल्या संघाच्या गोलंदाजांचे कौतुक करताना म्हटले,
“आमच्याकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण आहे. आम्हाला आमच्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण करावी लागेल. वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाला २० बळी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू.”
४०० कसोटीबळी मिळवण्यासाठी लायनला हवे १० बळी
सध्या ऑस्ट्रेलियाचा क्रमांक एकचा फिरकीपटू असलेला लायन ४०० कसोटी बळी मिळवण्यापासून १० बळी दूर आहे. शेन वॉर्ननंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ठरेल. लायनने आपल्या या कारकीर्दीविषयी बोलताना म्हटले, “मी कुठून सुरुवात केली होती आणि आता कोठे आहे हे पाहून मी रोमांचित होतो. मला आशा आहे की, आगामी मालिकेत मी ४०० धावांचा टप्पा पूर्ण करेल. मला भारतासारख्या संघाविरुद्ध खेळताना प्रेरणा मिळते.”
लायनने भारताविरुद्ध नेहमीच चमकदार कामगिरी केली आहे. त्याने भारताविरुद्ध सात वेळा पाच किंवा पाचपेक्षा अधिक बळी मिळवले आहेत. आगामी मालिकेतही ऑस्ट्रेलिया संघाला लायनकडून अपेक्षा असतील.
संबधित बातम्या:
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– शेन वॉर्नने निवडली पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन, या खेळाडूंना दिले स्थान
– कसोटी मालिका नशिबाने जिंकता येत नाहीत; या खेळाडूने सुनावले टीकाकारांना खडे बोल