सोमवारी (१९ एप्रिल ) झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारत ४५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात देखील राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे धावा करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका केली जात आहे. अशातच राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने त्याच्या बचावात भाष्य केले आहे.
गतवर्षी युएई मध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाला मध्यक्रमातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात, मुंबईकर शिवम दुबेला ४.४ कोटी खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. परंतु पहिल्या ३ सामन्यात त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात, १८९ धावांचा पाठलाग करत असताना शिवम दुबेला डेविड मिलरच्या आधी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. परंतु त्याने २० चेंडूत अवघ्या १७ धावा केल्या आणि बाद झाला होता. यामुळे त्याच्यावर टीकांचा पाऊस पडत आहे.
शिवम दुबेच्या कठीण काळात संजू सॅमसन त्याचा पाठीराखा झाला आहे. त्याने म्हटले की,” आमचा फलंदाजी क्रम योग्य प्रकारे सेट करण्यात आला आहे.तसेच शिवम दुबे फिरकी आणि जलद गोलंदाजांना चांगल्याप्रकारे खेळू शकतो.म्हणून तो चौथ्या क्रमांकावर अनुकूल आहे. तसेच हे परिस्थितीवर देखील अवलंबून असते.जर खेळपट्टी चांगली असेल तर तो चौफेर फटकेबाजी करू शकतो. त्याने घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.तो चांगला दिसून येत आहे. येत्या सामन्यांमध्ये आम्ही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहोत. ”
डेनियल विटोरीने केली होती टीका
क्रिकइन्फोला दिलेल्या एका मुलाखतीत, न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार डेनियल विटोरी याने म्हटले की, “भारतात गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू असल्याने तो (शिवम ) खूप आकर्षित करतो. मला वाटते की, जेव्हा तुमच्यावर एक भारतीय अष्टपैलू खेळाडू असण्याचा ठप्पा लागतो. तेव्हा तुमच्याकडून अपेक्षा वाढून जातात. लिलावात देखील तुम्हाला चांगली रक्कम मोजून संघात स्थान दिले जाते. राजस्थान रॉयल्स ने त्याच्यावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघापेक्षा जास्त बोली लावून संघात स्थान नाही दिले पण तरी ती किंमत जास्तच आहे. परंतु माझे म्हणणे आहे की, तो दोन्ही स्तरात अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करत आहे.”
महत्वाच्या बातम्या:






