भारताने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 151 धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने मान्य केले की, त्याने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एक मोठी चूक केली.
जो रुटने मान्य केले की त्यांनी भारताच्या तळाच्या फलंदाजांना खूप कमी लेखले. लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने सामन्यावर पकड घेतली होती, पण मोहम्मद शमी (नाबाद 56) आणि जसप्रीत बुमराह (नाबाद 34) यांनी नवव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करून भारताला सामन्यात परत आणले होते.
इंग्लंडचा संघ 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दोन सत्रात अवघ्या 120 धावा करून तंबूत परतला. त्यांना 151 धावांनी हार पत्करावी लागली. ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलतांना रुट म्हणाला, कर्णधार म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी होती. रणनीतीच्या दृष्टीने माझी कुठेतरी चूक झाली. शमी आणि बुमराह यांच्यातील भागीदारी हा खेळातील टर्निंग पॉईंट ठरला आणि आम्ही त्यांना कमी लेखून मोठी चूक केली.
तो पुढे म्हणाला, आम्ही ज्या प्रकारे खेळलो ते खूप निराशाजनक होते. रूटने हेही कबूल केले की, शमी आणि बुमराहविरुद्ध शॉर्ट बॉलची रणनीती अपयशी ठरली.
तो पुढे म्हणाला, ‘आम्ही यष्टींवर अधिक चेंडू टाकू शकलो असतो. शॉर्ट बॉल टाकण्याचे डावपेच चालले नाही. शिवाय याचे श्रेय दोन्ही खेळाडूंना जाते, त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. दोन्ही संघांमध्ये थोडा ताण-तणाव दिसून आला.’ रूट म्हणाला, ‘विराटची शैली वेगळी आहे आणि माझी शैली वेगळी आहे. मैदानावर किंवा बाहेर आमच्यात कटुता आहे, असे मला वाटत नाही.’
दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लिश माध्यमांमध्ये भारतीय संघाचे गुणगान, तर इंग्लड खेळाडूंवर बोचरी टिका, फोटो तुफान व्हायरल
शमी-बुमराहच्या जोडीने केलेली भागीदारी पाहून युजवेंद्र चहलला सुचली मस्ती; केले ‘असे’ ट्विट
मैदानात घुसलेल्या ‘त्या’ प्रेक्षकाला जडेजाने विचारलेला ‘हा’ प्रश्न






