---Advertisement---

“आम्ही भारतीय संघाला पराभूत करू”; पाकिस्तानी कर्णधाराचे बडेबोल

On: गुरूवार, ऑक्टोबर 14, 2021 7:48 PM
---Advertisement---

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने येत असतात त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना हाय-व्होल्टेज सामना पहायला मिळत असतो. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. त्यामुळे हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येत असतात. आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत देखील भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत. त्यापूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने भारतीय संघाला चेतावणी दिली आहे.

आमचेच पारडे जड

बाबर आझमने आयसीसीच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आम्ही गेल्या ३ वर्षांपासून इथे क्रिकेट खेळतोय. त्यामुळे आम्हाला येथील परिस्थितीचा चांगलाच अंदाज आहे. आम्हाला चांगलेच माहीत आहे की, येथील खेळपट्टी कशी असेल आणि फलंदाजांना इथे काय करावे लागेल. सामन्यात जो संघ चांगला खेळणार तो विजयी होणार. मला वाटते की आम्हीच जिंकणार.”

इतिहास भारताच्या बाजूने

भारत-पाकिस्तान यांचा आयसीसीच्या स्पर्धेतील इतिहास पाहिला तर, पाकिस्तान संघाने भारतीय संघाला आयसीसी टी२० विश्वचषक आणि वनडे विश्वचषक स्पर्धेत एकदाही पराभूत केले नाहीये. याबाबत बोलताना तो म्हणाला की, “आमच्यावर दबाव असणार आहे हे आम्हाला माहीत आहे. मी आशा करतो की, हा सामना जिंकून आम्ही विजयी लय निर्माण करू. एक संघ म्हणून आत्मविश्वास असणे खूप गरजेचे आहे. आमचा आत्मविश्वास आणि आत्मबळ खूप उंच आहे. आम्ही भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा नव्हे तर भविष्यात येणाऱ्या गोष्टींचा विचार करतोय आणि त्यांची तयारी करतोय.”

तसेच संघाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बाबर आजम म्हणाला, “सर्व खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. आम्हाला वरिष्ठ खेळाडूंकडून खूप काही शिकायचं आहे ज्यांनी यापूर्वी विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत.” ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनची पाकिस्तान संघाच्या फलंदाजी सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज वर्नेन फिलेंडरची गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---