भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाला २२७ धावांनी पराभूत केले आहे. यानंतर भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मार्ग कठीण होताना दिसत आहे. विजयानंतर इंग्लंड संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर भारतीय संघाची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांपैकी एक संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध लॉर्डस मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. भारतीय संघाला अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंड संघाविरुद्ध किमान २-१ च्या फरकाने कसोटी मालिका जिंकावी लागणार आहे. नुकतीच याबाबत भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही गुणतालिकेवर लक्ष केंद्रित करणार नाही”
भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यावर कर्णधार विराट कोहली म्हणाला, “आमच्यासाठी काहीच बदललं नाही आहे. अचानक लॉकडाऊन असल्यामुळे नियम बदलले गेले आहेत. अशावेळी आपल्या नियंत्रणात काहीच नसते. तेव्हा नियंत्रणात फक्त एकच गोष्ट असते ती म्हणजे आपली मैदानातील कामगिरी. आम्ही गुणतालिका आणि बाहेरील गोष्टींवर लक्ष केंद्रित नाही करत आहोत. काही गोष्टींसाठी काहीच तर्क नसतात आणि तुम्ही या गोष्टींना घेऊन तासनतास चर्चा करू शकतात. पण एक संघ म्हणून आमच्या हातात एकच गोष्ट आहे ती म्हणजे, मैदानात जाऊन चांगले क्रिकेट खेळणे. आणि आमचे लक्ष्य तेच आहे.”
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका संपल्यानंतर अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा प्रतिस्पर्धी निश्चित होईल. जर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ड्रॉ झाली तर ऑस्ट्रेलियन संघाला लॉर्डस मध्ये अंतिम सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघाला जर अंतिम फेरी गाठायची असेल तर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध किमान दोन कसोटी सामने जिंकायचे आहेत.
भारतीय संघ जर इंग्लंड संघाला २-१ ने पराभूत करण्यास यशस्वी झाला तरी भारतीय संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. तसेच इंग्लंड संघाने १-० , २-० किवा २-१ ने जरी मालिका जिंकली तर ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत दाखल होणार. इंग्लंड संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी मालिका ३-०, ३-१ किंवा ४-० ने जिंकावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी बांग्लादेशला मोठा झटका, हा प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर
या ७ खेळाडूंनी एक दोन नाही तर सलग तीन कसोटीत जिंकलाय सामनावीर पुरस्कार
कर्णधारपद सोडण्याची योग्य वेळ कोहलीला माहिती आहे, माजी खेळाडूने केली पाठराखण