पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या तयारीसाठी आयोजित शिबिरातून भारतीय वेटलिफ्टर अचिंता शिउली याला बाहेर काढण्यात आलं आहे. शिउलीला एनआयएस पटियालाच्या महिला वसतिगृहात प्रवेश करताना पकडण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये अचिंतानं सुवर्णपदक जिंकलं होतं.
भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, “अशा प्रकारची वागणूक खपवून घेतली जाणार नाही.” अचिंताला तातडीनं कॅम्प सोडण्यास सांगण्यात आलं. यासह अचिंताच्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. अचिंता या महिन्यात थायलंडमधील फुकेत येथे होणारा आयडब्लूएफ विश्वचषक खेळू शकणार नाही, जो पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेसाठी अनिवार्य होता.
ही घटना गुरुवारी (14 मार्च) रात्री घडली. 22 वर्षीय अचिंताला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं आणि त्याचा व्हिडिओ बनवला. यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि NIS पटियालाचे कार्यकारी संचालक विनीत कुमार यांना याची तात्काळ माहिती देण्यात आली. व्हिडिओ पुरावा असल्यामुळे तपास समिती स्थापन करण्यात आली नाही.
पटियाला येथे मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहं आहेत. सध्या महिला बॉक्सर आणि कुस्तीपटू एनआयएस पटियालामध्ये आहेत. यापूर्वी वेटलिफ्टिंग महासंघानं राष्ट्रकुल आणि युवा ऑलिम्पिक चॅम्पियन जेरेमी लालरिनुंगा यालाही अनुशासनहीनतेमुळे राष्ट्रीय शिबिरातून काढून टाकलं होतं.
अचिंता शिउलीनं बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या 73 किलो वजनी वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानं स्नॅचमध्ये 143 किलो वजन, तर क्लीन अँड जर्कमध्ये 170 किलो वजन उचललं होतं. अचिंता शिउली हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे. 2021 मध्ये ताश्कंद येथे झालेल्या ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या 73 किलो गटात त्यानं रौप्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर शिउलीनं डिसेंबर 2021 मध्ये कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपच्या 73 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून बर्मिंगहॅमचं तिकीट बुक केलं होतं. तो 2019 च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 : नवीन कर्णधार, अन् प्रमुख खेळाडूंना दुखापत, पाहा गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग 11
हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडल्यानंतर प्रशिक्षक आशिष नेहराची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
कुस्तीपटू विनेश फोगटनं ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये गोंधळ घातला, जाणून घ्या काय घडलं