भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सध्या रणजी ट्रॉफी २०२१-२२ चे (Ranji Trophy 2021-22) सामने सुरू आहेत. युवा खेळाडूंबरोबर अनेक अनुभवी खेळाडूही रणजीच्या रणांगणात उतरले आहेत. अगदी पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री (Manoj Tiwary sports minister) आणि माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwary) हादेखील रणजी ट्रॉफीत बंगाल संघाकडून खेळतो आहे. परंतु क्रिकेटपटू ते मंत्री बनलेल्या तिवारीला प्रत्यक्षात क्रिकेटच्या मैदानात मात्र अपयश (Manoj Tiwary Fail In Ranji) हाती येताना दिसत आहे. पहिल्या सामन्यात फेल ठरल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याची गाडी रुळावरून घसरतानाच दिसली.
हैदराबादविरुद्धच्या कटक येथे सुरू असलेल्या दुसऱ्या रणजी सामन्यात तिवारी केवळ २ धावांवर झेलबाद झाला. १४ चेंडूंचा सामना करताना त्याने या धावा केल्या होत्या. तत्पूर्वी बडोदाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात तो भोपळाही न फोडता माघारी परतला होता. तर दुसऱ्या डावात त्याने ३७ धावांची उपयुक्त खेळी केली होती. असे असले तरीही, बंगालने ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला होता.
हेही वाचा- “…म्हणून क्रिकेट सोडून राजकारण निवडले,” आमदार मनोज तिवारीचा उलगडा
दरम्यान मनोज तिवारीने गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून शिबपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यादरम्यान त्याने भाजपच्या रतीन चक्रवर्ती यांचा ६००० हून अधिक मतांनी पराभव केला होता.
राजकारणाच्या खेळपट्टीवर उतरल्यानंतर मनोज तिवारी क्रिकेटपासून काही काळ दूर राहिला होता. आता तो रणजी ट्रॉफी स्पर्धेद्वारे पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याचे १८ वे वर्ष असणार आहे. त्याने शेवटचा सामना मार्च २०२० मध्ये सौराष्ट्र संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला होता. त्यानंतर तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता.
मनोज तिवारीची कारकीर्द (Manoj Tiwary stats)
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीला प्रथमश्रेणी क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्याने १२६ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ५०.३६ च्या सरासरीने ९००२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २७ शतक आणि ३७ अर्धशतक झळकावले आहेत. यादरम्यान नाबाद ३०३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तसेच, भारतीय संघाकडून त्याने १२ वनडे आणि ३ टी२० सामने देखील खेळले आहे. यादरम्यान त्याने वनडे क्रिकेटमध्ये १ शतक आणि १ अर्धशतक झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ राज्यात सुरू होतेय देशातील पहिलीच महिला क्रिकेट अकादमी, विनाशुल्क पुरवल्या जातील सुविधा