---Advertisement---

लुईसच्या वादळात उडाली ऑस्ट्रेलिया; टी२० मालिकेत ४-१ अशी सरशी साधत वेस्ट इंडिजने दाखवला दम

On: शनिवार, जुलै 17, 2021 5:42 PM
---Advertisement---

ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) व ओमान येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी आपण तयार असल्याचे विश्वविजेत्या वेस्ट इंडीजने दाखवून दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात झालेल्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडीजने ४-१ अशी सरशी साधली. सेंट लुसिया येथील अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडीजने विजय मिळवला. तुफानी खेळी करणाऱ्या सलामीवीर एविन लुईसला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. वेस्ट इंडिजचा फिरकीपटू हेडन वॉल्श जूनियर याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

वेस्ट इंडीजची मोठी धावसंख्या
यापूर्वीच मालिका नावावर केल्याने अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने विनादबाव खेळण्यास सुरुवात केली. सलामीवीर एविन लुईस याने अवघ्या ३४ चेंडूत ४ चौकार व ९ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने ७९ धावांची खेळी केली. कर्णधार निकोलस पूरन याने ३१ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडीजने निर्धारित २० षटकात सर्वबाद १९९ धावा उभारल्या. ऑस्ट्रेलियासाठी वेगवान गोलंदाज ऍण्ड्रू टाय याने सर्वाधिक तीन तर, ऍडम झंपा व मिचेल मार्श यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

वेस्ट इंडीजची अप्रतिम गोलंदाजी
या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मनमोकळेपणे फटकेबाजी करू दिली नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच (३४), मिचेल मार्श (३०) व मॅथ्यू वेड (२६) यांनी थोडाफार संघर्ष केला. मात्र, शेल्डन कॉट्रेल व आंद्रे रसेल यांच्या प्रत्येकी ३ बळींमुळे त्यांचा डाव ९ बाद १८३ असा रोखला गेला. वेस्ट इंडीजने १६ धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली.

मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत वेस्ट इंडीजने मालिका खिशात घातलेली. मात्र, चौथ्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागलेला. निकोलस पूरन याच्या नेतृत्वातील देखील हा पहिलाच मालिका विजय आहे. उभय संघांमधील तीन सामन्यांची वनडे मालिका २१ जुलैपासून सुरू होईल. यानंतर वेस्ट इंडीज संघ पाकिस्तानविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत-श्रीलंका येणार आमने-सामने, ‘अशी’ आहे दोन्ही संघांची वनडेतील एकमेकांविरुद्धची कामगिरी

टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याचे कळताच ‘मौका मौका’ ट्रेंड, पाहा काही खास मीम्स

शोएब अख्तरच्या सर्वकालिन वनडे संघात ‘या’ भारतीयांना जागा, पण विश्वविजेत्या कर्णधाराकडे मात्र दुर्लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---