रायपुरच्या शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सध्या ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिज लिजेंड्सच्या संघाने इंग्लंड लिजेंड्स संघाचा पराभव केला. यासह त्यांनी सेमिफायनल मध्ये देखील आपली जागा पक्की केली. आता त्यांचा सामना इंडिया लिजेंड्स संघाशी होईल.
फलंदाजांच्या जोरावर मिळवला विजय
वेस्ट इंडिज लिजेंड्स आणि इंग्लंड लिजेंड्स यांच्यात खेळवला गेलेला ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’चा अखेरचा साखळी सामना अतिशय रंगतदार झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने बाजी मारली. पहिल्यांदा फलंदाजी करतांना इंग्लंडने २० षटकात ३ बाद १८६ अशी मजबूत धावसंख्या उभारली होती. यात फिल मस्टर्ड आणि ओवेस शहा यांच्या अर्धशतकांचा समावेश होता.
वेस्ट इंडिजला हे लक्ष्य गाठणे अवघड जाईल, असाच अनेकांचा होरा होता. मात्र तो खोटा ठरवत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी कमालीचे प्रदर्शन केले. सलामीवीर ड्वेन स्मिथने ३१ चेंडूत ५८ धावा करत वेस्ट इंडिजच्या विजयाची पायाभरणी केली. तर अष्टपैलू नरसिंग देवनारायणने ३७ चेंडूत नाबाद ५३ धावा करत वेस्ट इंडिजचा विजय सुकर केला. ड्वेन स्मिथला त्याच्या स्फोटक खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
सेमिफायनलमध्ये लारा-सचिन येणार आमने-सामने
वेस्ट इंडिज लिजेंड्सने या विजयासह सेमिफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. आता ब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिजची लढत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंडिया लिजेंड्सच्या संघाशी होईल. आज म्हणजेच १७ मार्च रोजी हे दोन्ही संघ फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी झुंजतील. दुसरीकडे श्रीलंका लिजेंड्स संघ दक्षिण आफ्रिका लिजेंड्स संघाशी १८ मार्च रोजी दुसऱ्या सेमिफायनल मध्ये भिडेल.
महत्वाच्या बातम्या:
सूर्यकुमार यादवला वगळण्याच्या निर्णयावर गौतम गंभीर नाराज, म्हणाला, संधी न देताच
या ५ भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाने गमावला तिसरा टी२० सामना
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, आयपीएलमध्ये मिळू शकते सामना पाहण्याची संधी