तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाची गाडी रुळावरून पुन्हा खाली घसरली आहे. शनिवारी (दि. 29 जुलै) बार्बाडोसच्याच मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. यामुळे यजमान संघाने भारतीय संघाला सहजरीत्या पराभूत केले. विशेष म्हणजे, रोहित शर्मा आणि विराट कोहली या सामन्यातून बाहेर होते. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा वनडे सामना यजमान संघाने 6 विकेट्सने आपल्या नावावर केला. यासोबतच त्यांनी मालिकेत 1-1 अशी बरोबरीही साधली. या विजयाचा शिल्पकार कर्णधार शाय होप ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नाणेफेक आणि सामना दोन्ही गमावले
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरला. यावेळी भारतीय संघाने फलंदाजीला उतरत 40.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 181 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाने 36.4 षटकात 3 विकेट्स गमावत 182 धावा केल्या आणि 6 विकेट्सने सामना जिंकला.
A clinical performance by the West Indies in Bridgetown as they cruise past India to level the series 💥#WIvIND | 📝 https://t.co/194cPaXqId pic.twitter.com/12uNdnfnSo
— ICC (@ICC) July 30, 2023
विंडीजसाठी कर्णधार हिरो
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाय होप (Shai Hope) चमकला. त्याने यावेळी 80 चेंडूंचा सामना करत नाबाद 63 धावांची सर्वोच्च खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कीसी कार्टी यानेही नाबाद 48 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त सलामीवीर काईल मेयर्स यानेही 36 धावा केल्या. इतर 3 फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकले नाहीत. मात्र, त्यांनी संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला.
शार्दुल चमकला
भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूर याने उच्च दर्जाची गोलंदाजी केली. त्याने यावेळी 8 षटके गोलंदाजी करताना 42 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त फक्त कुलदीप यादव यालाच एक विकेट घेण्यात यश आले.
भारतीय फलंदाजी फ्लॉप
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निराशाजनक प्रदर्शन केले. एकट्या ईशान किशन (Ishan Kishan) याने 55 चेंडूत 55 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. यामध्ये 1 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज चमकला नाही. शुबमन गिल 34 धावांवर तंबूत परतला. तसेच, सूर्यकुमार यादव 24, रवींद्र जडेजा 10, शार्दुल ठाकूर 16, संजू सॅमसन 9, कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) 7 आणि अक्षर पटेल 1 धावा करून बाद झाले.
विंडीजच्या गोलंदाजांची कमाल
यावेळी विंडीजकडून गोलंदाजी करताना दोन गोलंदाज चमकले. त्यांनी प्रत्येकी 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. ते गोलंदाज म्हणजेच गुडाकेश मोती आणि रोमारियो शेफर्ड होय. त्यांच्याव्यतिरिक्त अल्झारी जोसेफ यानेही 2 विकेट्स घेतल्या. तसेच, जेडेन सिल्स आणि यानिक कारिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (West Indies won by 6 wickets against team india 2nd odi match)
महत्त्वाच्या बातम्या-
BREAKING: स्टुअर्ड ब्रॉडकडून निवृत्तीची घोषणा! ‘या’ दिवशी करणार क्रिकेटला अलविदा
विराट-रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा 181 धावांत धुव्वा! मधली फळी सपशेल अपयशी